प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि २०
कर्जत : कर्जत तालुक्यातील सर्व पेट्रोल-डिझेल वितरक संघटनेच्या वतीने कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयास २५ फोल्डिंग बेड भेट देत कोरोना लढाईत आपले सामाजिक दायित्व सिद्ध करीत अभिनव उपक्रम राबविला. सदर बेडचे लोकार्पण प्रांताधिकारी अर्चना नष्टे, पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्यासह सर्व विभाग प्रमुखाच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी डॉ सुचेता यादव यांच्याकडे सुपूर्द केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यात आरोग्य विभागासह सर्व प्रशासकीय यंत्रणा अत्यंत चांगले काम करत असून त्यामुळेच तालुक्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. तसेच यापुढे आढळू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना तालुक्यातील आरोग्य यंत्रणा मात्र सर्व शक्यता गृहीत धरून आपली तयारी करत आहेत. त्यांना साथ म्हणून विविध सामाजिक संघटना पुढे येत असून सर्वतोपरी सहकार्य करीत आहे. यासह आरोग्य यंत्रणेकडे तोकड्या असणाऱ्या सूखसुविधेला सहकार्य करण्याची भूमिका निभावत आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील पेट्रोल डिझेल वितरक संघटनेच्यावतीने उपजिल्हा रुग्णालयास २५ फोल्डिंग बेड भेट देण्यात आले.
या बेडचे लोकार्पण प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या हस्ते वैद्यकीय अधीकारी डॉ सुचेता यादव, डॉ मधुकर काळदाते यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी पोलीस उपअधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, गटविकास अधिकारी अमोल जाधव, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यासह कर्जत तालुका पेट्रोल डिझेल वितरक अनुज काळदाते, सचिन लांगोरे, दादासाहेब फाळके, हर्ष शेवाळे, अशोक अनारसे, विपुल दोशी, डॉ अंकुश कदम, संतोष पारेख, प्रवीण तापकीर, डी. एस. सोनवणे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ सुचेता यादव यांनी वितरकाचे आभार मानताना उपजिल्हा रुग्णालयाला काही औषधाची आवश्यकता असून ती सामाजिक संघटनानी उपलब्ध करून द्यावीत असे आवाहन केले.