Shrigonda : मढेवडगावात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने घेतल्या कोविड विषाणूच्या नमुना चाचण्या

0
फोटो- मढेवडगांव ता. श्रीगोंदा येथे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने करोना संबंधित नमुना चाचण्या घेतल्या यावेळी तहसीलदार महेंद्र माळी, पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव, डॉ. नितीन खामकर, सरपंच महानंदा मांडे.( छाया दादा सोनवणे)

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

श्रीगोंदा – मढेवडगाव येथे केंद्र सरकारच्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद संस्थेच्या वतीने सार्स करोना-२ संक्रमणाचा कल जाणून घेण्यासाठी व यामुळे होणारा कोविड-१९ या नवीन आजाराच्या पसरलेल्या महामारीमुळे त्याच्या विस्ताराची कारणे शोधण्यासाठी व शरीरात निर्माण होणारे प्रतिपिंडे अभ्यासण्याच्या हेतूने गावातील चाळीस लोकांच्या परिवाराची पार्श्वभूमी, घराचा तपशील, संसर्ग व वैद्यकीय इतिहासाचे प्रश्न विचारून त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले.

केंद्र सरकारच्या या तपास मोहिमेत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद या संस्थेच्या मार्फत देशातील २१ राज्यातील ६९ जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. तर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, अकोला, राहता, नेवासा, शेवगाव, पारनेर, नगर तालुक्यासह अहमदनगर शहराचा या तपासणी साठी निवड झाली होती. यासाठी संस्थेच्या व जिल्हा आरोग्य विभागांचे दहा पथके पाठवली होती.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय पथकातील डॉ. सुमेधा देठे, डॉ. सुनिल शिर्के व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर, डॉ. पूजा लोखंडे व आशा वर्कर कर्मचाऱ्यांनी गावातील घरोघरी जाऊन चाळीस लोकांची वैद्यकीय माहिती व रक्ताचे नमुने घेतले. यावेळी तहसीलदार महेंद्र माळी, पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव, प्रा. फुलसिंग मांडे, सरपंच महानंदा मांडे, उपसरपंच कल्याणी गाढवे, ग्रामसचिव गोरक्ष गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य जयश्री धावडे, प्रतीक्षा मांडे, अक्षय गोरे, काळूराम ससाणे, अमोल गाढवे, सचिन उंडे, संतोष गुंड, महेंद्र उंडे पथकाच्या मदतीसाठी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here