कर्जत : मुळची मुंबई वाशी येथील महिला राशीन येथे आपल्या सुनेकडे आली असता तिला क्वारंटाईन करण्यात आले होते. बुधवारी रात्री तिला अचानक त्रास होऊ लागल्याने पुढील उपचारासाठी नगरला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर तिचा स्वॅब पॉझिटिव्ह आल्याने राशीनसह कर्जत तालुक्याचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
या महिलेचा कोरोना अहवाल गुरुवारी रात्री पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यानंतर कर्जत तालुका प्रशासन कामाला लागले. अनेक दिवसांपासून कोरोनामुक्त असणाऱ्या कर्जत तालुक्याला ग्रहण लागत कोरोना एन्ट्री झाल्याने नागरिक भयभीत झाले आहे. शुक्रवारी सकाळी ही महिला राहत असलेला भाग पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आला असून त्यांच्या संपर्कात असणाऱ्या १३ व्यक्तींना कोरोना चाचणीसाठी नगरला रवाना करण्यात आली आहे, अशी माहिती प्रांताधिकारी अर्चना नष्टे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी दिली. वरील १३ जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
मूळची मुंबई (वाशी) येथील ६५ वर्षीय महिला आपल्या सुनेकडे राशीन ता कर्जत येथे आली होती. मुंबईहून आल्यामुळे सदर महिलेला नगर येथील जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, असे समजते. त्यानंतर सदर महिलेस राशीन येथे कोरोन्टाईन करण्यात आले होते. मात्र, बुधवारी रात्री त्यांना अचानक त्रास होऊ लागल्याने पुढील उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने नगरला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला होता. या महिलेस कोरोना सदृश लक्षणे जाणवत असल्याने तिचा स्वॅब घेतला असता तो गुरुवारी रात्री पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यावर कर्जतचे स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले.
शुक्रवारी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, पोलीस उपअधीक्षक संजय सातव, तहसीलदार सी एम वाघ, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप पुंड यांनी तात्काळ सूत्रे हालवीत राहत असलेला परिसर प्रतिबंधित करीत नागरिकांना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले. यासह राशीन येथील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दुपारी अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी राशीन भागाला भेट देत स्थानिक प्रशासनाशी सवांद साधत पुढील सूचना दिल्या. ही महिला आपल्या सुनेकडे आली असल्याने तिच्या संपर्कात आलेल्या १३ व्यक्तींना कोरोना चाचणीसाठी नगर येथे हलविण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी दिली आहे. त्यांचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत असून खबरदारीचा उपाय म्हणून कर्जतचा आरोग्य विभाग दक्ष ठेवण्यात आला आहे.
…अखेर कर्जत तालुक्याला कोरोनाची नजर लागली
मागील दोन महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत शहर आणि तालुक्यात लॉकडाऊन आणि संचारबंदी पुकारण्यात आली होती. या काळात जामखेड, बारामती, दौड आणि अहमदनगर चारही बाजूने कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. मात्र, कर्जत तालुका अद्याप कोरोनामुक्त राहिला होता. मात्र, त्यास गुरुवारी नजर लागली आणि कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आणि त्याचा मृत्यू झाल्याने नागरिक भयभीत झाले आहे.
आपल्याकड़े कुठे काय आहे ?
संपूर्ण जगात कोरोनाचा थैमान सुरु होता.देश,राज्य आणि जिल्हाही याचा सामना करीत असतांना कर्जत तालुका कोरोनामुक्त होता.लॉकडाऊन दरम्यान प्रशासन कड़क नियमांची अंमलबजावणीचा प्रयत्न करीत असताना लोक आपल्याकड़े कुठे काय आहे.असा सवाल करीत असतांना दोन महीने आपण कोरोना मुक्त असल्याने प्रशासन आणि जनताही गाफिल राहिल्याने कोरोनाचा शिरकाव झाल्याने आता सर्वांनी खबरदारी घेणे जिकरीचे झाले आहे.
राशिन ग्रामपंचायत हद्दीतील सहा प्रभागात एकूण २३०० कुटुंब असून १२ हजार लोकसंख्या आहे. २३ पथकाद्वारे या भागात सर्वे सुरु असून दोन किमीपर्यंतचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे. राखीव पोलीस दलाचे एक पथक, स्थानिक पोलीस तैनात करण्यात आले आहे. लोकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. कोणालाही कोरोना सदृश्य लक्षणे असल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी. प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रांताधिकारी अर्चना नष्टे, पोलीस उपअधीक्षक संजय सातव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप पुंड यांनी केले आहे.