International : Editorial : चीनला झोंबलेल्या मिरच्या

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

कोरानाच्या संकटातून अजून पूर्णतः सुटका झाली नसतानाही चीनला ठरवून घेतलेल्या उद्दिष्टाच्या वेळेत जगातील सर्वांत मोठी महासत्ता होण्याची घाई झाली आहे. चीनमधील सत्ताधारी पक्षाच्या स्थापनेला २०२४ मध्ये शंभर वर्षे होत आहेत. त्यावर्षी चीनला जगात आपण अव्वल क्रमांकावर आहोत, हे दाखवून द्यायचे आहे. त्यामुळे तैवान, तैपई, जपान, हाँगकाँग, तिबेट, व्हिएतनाम, फिलिपिन्स आदी देश, प्रातांना तो कायम त्रास देत असतो. तेथील भूभाग ताब्यात घेण्याची कुरघोडी तो करीत असतो.

भारताला तर चीन १९६२ पासून कायम त्रास  देत आला आहे. भारताच्या शेजारी असलेल्या बहुतांश राष्ट्रांना आर्थिक मदत करून त्यांना आपल्या अंकीत करण्याचा त्याचा प्रयत्न राहिला आहे. भूतान आणि अफगाणिस्तान हे दोनच देश त्याला अपवाद आहेत. चीनने ज्या पद्धतीने थेट अमेरिकेच्या जवळच्या देशांत संरक्षण साहित्य पुरवून तेथील बाजारपेठ काबीज केली आहे, ते पाहिले तर चीनची दूरदृष्टी त्यातून दिसते.  अमेरिकेने ज्या राष्ट्रांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली आहे, त्या राष्ट्रांच्या विरोधात असलेल्या राष्ट्रांना चीनने संरक्षणात्मकदृष्ट्या भरपूर मदत केली आहे. अमेरिकेचे मित्रराष्ट्र  असलेल्या पाकिस्तानलाही चीनने कच्छपि लावले आहे. रशिया परवडला; परंतु चीन नको, अशी मानसिकता अमेरिकेची झाली आहे.

चीनने अमेरिकेची संरक्षणाची बाजारपेठ काबीज केली आहे. त्यामुळे चीनला शह देण्यासाठी अमेरिकेने गेल्या काही वर्षांपासून भारताशी मैत्री वाढविली आहे. चीनही वारंवार आगळीक करीत आहे. त्यामुळे चीनविरोधात ऐनवेळी जागतिक महासत्तेची मदत हवी, म्हणून भारतही अमेरिकेशी राजनैतिक संबंध वाढवतो आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत तर अमेरिका आणि चीनचे संबंध कमालीचे बिघडले आहेत. दोन देशांतील व्यापार युद्धानंतर आता विषाणूचे युद्ध सुरू झाले आहे. चीन एकाचवेळी वेगवेगळ्या पातळ्यावर लढतो आहे.

भारताबरोबर कुरघोड्या, दक्षिण चीनी समुद्रात आक्रमक पावले आणि अमेरिकेबरोबरही अप्रत्यक्ष युद्ध करतो आहे. कोरोनाचा प्रसार चीनमधून झाला, तरी त्याबाबत दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी चीन कुरघोडी करतो आहे. एकीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर अहमदाबादमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर झुल्यावर झुलत असताना चीनी सैन्य मात्र डोकलाममध्ये घुसखोरी करीत होते. आताही भारत आणि चीनमधील सीमा प्रश्नावर तणाव निर्माण झाला आहे. आक्रमक धोरण घ्यायचे चीनने, सैन्य सीमेवर आणायचे त्यानेच, लष्कराचे हेलिकाॅप्टर सीमेवर आणायचे, भारतीय सैन्यावर हल्ला करायचा आणि उलट कांगावा करायचा, ही चीनची जुनीच व्यूहनीती आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतावरच बेछूट आरोप करताना भारताच्या लष्कराने चीनच्या सैनिकांना गस्त करताना रोखल्याचे म्हटले आहे. गालवन खोऱ्यामध्ये हा तणाव असून दोन्ही बाजूंनी सैनिकांची संख्या वाढविण्यात आली आहे.

लडाखच्या पूर्व भागात पँगाँग सरोवराजवळ दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये पाच-सहा मेच्या दरम्यान धक्काबुक्की झाली.  नऊ मे रोजी सिक्कीममध्ये पुन्हा दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने आले. कोरोनाचे मूळ शोधण्यासाठी आॅस्ट्रेलियाने मांडलेल्या प्रस्तावाला भारताने समर्थन दिल्यामुळे चीन अगोदरच खट्टू झाला होता. त्यात लडाखमधील वादावर अमेरिकेने भारताची बाजू उचलून धरल्यानंतर चीनचा तिळपापड झाला आहे. भारताबरोबरची सीमा असो किंवा दक्षिण चीन समुद्र; चीनला तिचे सत्तास्थान वापरण्याची खुमखुमी आहे. चीनची अशी कृती अडथळा निर्माण करणारी आहे,’ असे अमेरिकेतील उच्चपदस्थ अधिकारी अॅलिस वेल्स यांनी म्हटले आहे.

चीननेही अमेरिकेच्या टीकेला बिनबुडाचे म्हणून संबोधत प्रत्युत्तर दिले आहे. भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये लडाख आणि सिक्कीमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेल्या हाणामारीनंतर चीनने भारताविरोधात बोंबा मारण्यास सुरुवात केली आहे. भारतीय सैन्याने चीनच्या हद्दीतील गलवान व्हॅलीत प्रवेश केला असल्याचा आरोप चीनच्या सरकारी माध्यमांनी केला आहे. भारताने चीनसोबत झालेल्या कराराचे उल्लंघन केले आहे. त्याशिवाय भारताच्या या कृतीने दोन्ही देशातील सैन्यांतील संबंधाना हानी पोहोचली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भारताच्या कृतीमुळे पुन्हा डोकलामसारखी स्थिती निर्माण होऊ शकते, असेही चीनने म्हटले आहे. १९६२ च्या युद्धातही गलवान भाग वादाचे केंद्र ठरले होते.

या वादग्रस्त भागात तंबू उभारणे किंवा बांधकाम सुरू करणे ही गेल्या काही वर्षांपासून चीनची युक्ती आहे. एप्रिल-मे २०१३ मध्येही असाच संघर्ष झाला होता. यानंतर दोन्ही सैन्यांमध्ये २१ दिवस असाच लष्करी संघर्ष चालू राहिला आणि कुमक वाढवण्यात आली. चीनच्या सैन्याने भारतीय हद्दीत डीबीओ सेक्टरमधील डेपसंग बल्ज भागात १९ किलोमीटरपर्यंत घुसखोरी केली होती. त्याचप्रमाणे २०१८ मध्येही चीन सैन्याने तंबू बांधण्यासाठी डेमचोक सेक्टरमध्ये ३०० ते ४०० किलोमीटर घुसखोरी केली होती. अशा परिस्थितीत भारतीय सैन्यालाही नाइलाजाने पुढे सरकावे लागते. त्यामुळे संवादातून प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत दौन्ही सैन्यांमध्ये संघर्ष चालूच राहतो.

चीनची चिथावणीखोर आणि अडथळा निर्माण करणाऱ्या कृती पाहता आपल्या वाढत्या शक्तीचा चीन कशा प्रकारे वापर करील, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे अॅलिस वेल्स यांनी म्हटले होते. त्यांच्या या प्रतिक्रियेवर भारत-चीन सीमा प्रश्नावर चीन सातत्याने भूमिका स्पष्ट करत असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. सीमावादावर भारत आणि चीनदरम्यान चर्चा सुरू असून अमेरिकेला त्याच्याशी काहीही घेणे नाही. अमेरिकेची या वादावरील प्रतिक्रिया बिनबुडाची असल्याचे चीनने अमेरिकेला सांगतिले आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी भारत-चीन सीमावादावर चीनची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगितले. चीनचे सैनिक चीनच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करतील. सीमावर्ती भागात शांतता राखण्यास चीनचे सैन्य कटिबद्ध आहे. भारताला आम्ही आमच्यासोबत येण्याचे आवाहन करीत आहोत. भारत आणि पाकिस्तानमध्ये तिस-या देशाने लुडबूड करू नये, असे जेव्हा भारत म्हणतो, तेव्हा चीन लुडबूड करतो आणि अमेरिकेने केवळ भारताला पाठिंबा दिला, तरी दोन देशांत अमेरिकेची लुडबूड आहे, असे चीनला वाटते. कोरोना विषाणूच्या निर्मितीची निष्पक्ष चौकशी व्हावी या ऑस्ट्रेलियाच्या मागणीला जवळपास ६२ देशांनी पाठिंबा दिला आहे. भारत, जपान, रशिया या दिग्गज देशांचाही यामध्ये समावेश आहे. सर्वंच देशांचा चीनवर रोष आहे. त्यामुळे निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली आहे. या देशांमध्ये आफ्रिकन समूहाचे ५४ सदस्य देश चौकशी ठरावाचा को-स्पॉन्सर असेल. याशिवाय युरोपीय संघातील २७ देश आणि ब्राझिल, दक्षिण कोरिया, मेक्सिको, तुर्की आणि न्यूझीलंडनेही या ठरावाला पाठिंबा दिला आहे.

या ठरावात कुठेही चीनचा उल्लेख करण्यात आलेला नाही; मात्र ऑस्ट्रेलियाच्या या पुढाकारामुळे चीनचा मात्र संताप झाला आहे. चीनने ऑस्ट्रेलियाला बिफ आयातीवर बंदी घालण्याची धमकीच दिली आहे. शिवाय इतर आयात होणाऱ्या वस्तूंवर कर वाढवण्याचाही इशारा दिला आहे. कोरोना विषाणूच्या प्रसाराला चीनच जबाबदार असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या विरोधात जाण्याची भूमिका अमेरिकेने घेतली आहे. कोरोनाचा प्रसार कसा होतो, हे चीनला माहित असूनही त्यांनी जाणिवपूर्वक आपल्या लोकांना इतर देशात जाऊ दिले, असा आरोप अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांनी केला.

जगासाठी धोका निर्माण करणारे निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतले जातात. कोरोना पसरत असतानाही चीनचे लोक जगभरात का फिरत होते? चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला याचे उत्तर माहीत असेल, अशी टीका त्यांनी केली. अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्ध आणि त्यानंतर आताचे सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप, त्यातच भारताने अमेरिकेची केलेली पाठराखण आणि ल़डाखच्या संघर्षात अमेरिकेने भारताची घेतलेली बाजू विचारात घेतली, तर चीनला मिरच्या झोंबणे स्वाभावीक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here