Kada : कोरोनाच्या लढ्यात संघर्ष करणारी ‘धन्वंतरी’

0
रणरागिनीच्या कर्तृत्वाला कडेकरांचा सलाम

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री | राजेंद्र जैन

कोरोनाच्या जीवघेण्या संकटापुढे प्रत्येकजण धास्तावलेला असतानाच, स्वत:चा जीव धोक्यात घालून सरकारी रुग्णालयात रुग्णांची तपासणी करण्याचं जोखमीचे काम मागील दोन महिन्यांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इतर वैद्यकीय अधिका-यांच्या बरोबरीने एक महिला डाॅक्टर म्हणून प्रियांका शिंदे करीत आहेत. कोरोनाच्या लढ्यात संघर्ष करणा-या धन्वंतरी टीमच्या कर्तृत्वाला कडेकरांनी सलाम केला आहे. 
आष्टी तालुक्यातील कडा प्राथमिक आरोग्य केंद्र एक वर्षापासून गोरगरीबांसाठी वरदान ठरले आहे. प्रत्येक रुग्णांना उत्तम आरोग्यसेवा मिळावी. दवाखान्यात उपचारार्थ येणा-या रुग्णांची गैरसोय होऊ नये, म्हणून वैद्यकीय अधिका-यांनी रुग्णसेवेतून अवघ्या काही दिवसात कर्तृत्वाचा अनोखा ठसा उमटवला आहे. वर्षभरात दाखवलेली यशस्वी कामगिरी अन् आरोग्य कर्मचा-यांचं योगदान सत्कारणी लागले आहे. त्यामुळेच कड्याच्या सरकारी दवाखान्याची प्रतिमा पूर्णपणे लोकोपयोगी बनली आहे.
मात्र, मागील दोन महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सरकारकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा एक भाग म्हणून राज्यात टाळेबंदी करण्यात आली. एकीकडे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच, दुसरीकडे कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहून समाजातील प्रत्येक घटक धास्तावलेला आहे. कोरोना विषाणूचे जीवघेणे संकट वैद्यकीय अधिकारी, कर्मचा-यांसाठी अग्निपरिक्षा ठरले आहे. पण महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला संघर्षाचा वारसा पाठीशी असल्यामुळे डाॅक्टर्स स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोनाच्या शत्रूचा रात्रंदिवस मुकाबला करीत आहेत. हीच आरोग्यसेवा रुग्णांसाठी संजीवणी ठरली आहे.
कडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. नितीन मोरे, डाॅ. अनिल आरबे, डाॅ. तुषार जाणवळे, डाॅ. नितीन राऊत धन्वंतरीच्या टिमसोबत एकमेव महिला डाॅक्टर म्हणून प्रियांका शिंदे  कोरोना महामारीच्या महासंघर्षात रणरागिनी ठरल्या आहेत. इतर सहकारी डाॅक्टरांप्रमाणे प्रियांकांनी मोठ्या धाडसाने स्वत:ला रुग्णसेवेत वाहून घेतले आहे. कोरोनाच्या लढ्यात अथक संघर्ष करणा-या धन्वंतरी टिमच्या कर्तृत्वाला अन् रुग्णसेवेला कडेकरांनी सलाम ठोकला आहे.
कड्याचा रुग्णसेवेतून नावलौकिक…
वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी सर्वजण मागील दोन महिन्यांपासून रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून कोरोना महामारीचा जीव धोक्यात मुकाबला करीत आहेत. मागील एक वर्षात प्राथमिक आरोग्य केंद्राचा नावलौकिक हा सर्वांनी मिळून एकत्रित केलेल्या परिश्रमाचं यश आहे.

– डाॅ. नितीन मोरे, वैद्यकीय अधिकारी कडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here