Newasa : तालुक्यात तब्बल दीड महिन्याने कोरोना रुग्ण आढळला; नेवासा बुद्रुक येथे कल्याणहून आलेल्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

नेवासा – तालुक्यात तब्बल दीड महिन्यानंतर कोरोनाचा नवीन रुग्ण आढळला असून कल्याण येथून नेवासा बुद्रुक येथे आलेल्या साठ वर्षीय महिलाचा रिपोर्ट कोरोना रविवारी पॉझिटिव्ह आला, अशी माहिती नेवासा पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी यांनी दिली. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या हायरिस्क संपर्कात आलेल्या व्यक्तीने राहत्या घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावातील नागरिकांना दक्षतेमुळे या व्यक्तीस पकडण्यास यश आले आहे.

कल्याण येथून २० मे रोजी सदर महिला नेवासा बुद्रुक येथे आल्यानंतर तिला जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. २२ मे रोजी तिला त्रास होऊ लागल्याने प्राथमिक तपासणी करून तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी सकाळी आलेल्या अहवालातून तिला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी यांनी सांगितले.

या रुग्णाच्या संपर्कात आणखी कोण कोण व्यक्ती आल्या आहेत. याची चौकशी आरोग्य विभागाने सुरू केली असून त्यातील हायरिस्क व लो रिस्क असे वर्गीकरण करून हायरिस्क संपर्कातील व्यक्तींना स्त्राव तापसणीसाठी पाठवणार असल्याचे डॉ.सूर्यवंशी यांनी सांगितले.

दरम्यान, नेवासा बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत जाऊन तहसीलदार रुपेश सुराणा, पोलीस निरीक्षक रणजित डेरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.मोहसीन बागवान, डॉ.रविंद्र कानडे, आरोग्य सेवक शंकर मालदोडे, ग्रामस्तरीय दक्षता समिती सदस्यांनी पाहणी करून सूचना केल्या. १८ एप्रिलनंतर नेवासा तालुक्यात एक ही रुग्ण पॉजिटिव्ह आढळला नसताना आज पुन्हा तालुक्यात एक महिला पॉझिटिव्ह भेटल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

पॉझिटिव्ह महिलेच्या हायरिस्क संपर्कातील व्यक्तीने राहत्या घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गावातील नागरिकांनी व पोलीस निरीक्षक रणजित डेरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रताप दहिफळे, निवृत्त आर्मी मेजर बर्डे, पोलिस मित्र संतोष गायकवाड यांनी त्याला पाठलाग करून त्यास पकडले व या महिलेच्या संपर्कात आलेल्या सात व्यक्तींना तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here