Rahuri : वांबोरीत कोरोनो रुग्ण; तालुक्यात पहिला रुग्ण आढळल्याने प्रशासनाची धावपळ

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

कल्याण (मुंबई) येथून आठ दिवसांपूर्वी वांबोरी (ता. राहुरी) येथे आलेला सव्वीस वर्षाचा तरुण आज (रविवारी) कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे, राहुरी तालुक्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे.

त्याच्या संपर्कात किती जण होते? याचा पोलीस व महसूल प्रशासनाकडून शोध सुरू आहे.विशेष म्हणजे जे नव्याने रूग्ण सापडत आहेत, त्यांचे सर्व कनेक्शन मुंबईच आहे. कर्जत, पाथर्डी, अकोले आणि आता राहुरीतही मुंबईचाच रूग्ण आढळून आला आहे.

रविवारी (ता. १७) तो तरुण वांबोरी येथे मामाकडे आला होता. तो कल्याण येथे राहत होता व चेंबूर येथे कामाला जात होता. त्याचे मामा वांबोरी ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहेत. त्याला, लहानपणापासून मामांनी सांभाळले असल्याने, कोरोनाचा धुमाकूळ सुरू झाल्यापासून तो मामाकडे परतण्यासाठी वाट बघत होता. चौथा लॉकडाऊन शिथिल होताच त्याने, वांबोरी गाठली. नियमाप्रमाणे मामांनी प्रशासनाला कळविल्यावर आल्या दिवशीच त्याला वांबोरी जिल्हा परिषद शाळेत संस्थात्मक क्वारंटाईन ठेवले होते.

शुक्रवारी (ता. २२) त्याला ताप आला. घसा दुखायला लागला. खोकला सुरू झाला. कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्याच दिवशी रात्री दहा वाजता त्याला नगर येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. आज (रविवारी) सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना टेस्ट लॅबमध्ये त्याची घशातील स्त्राव तपासणी झाली. त्यात, तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.

त्याला ज्या शाळेत संस्थात्मक क्वारंटाईन ठेवले होते. त्या शाळेत जिल्हा बाहेरून विविध ठिकाणांवरून आलेले नऊ जणांना ठेवले आहे. त्याला जेवणाचा डबा देण्यासाठी मामाच्या घरातील किती व्यक्ती आल्या. वांबोरी गावातील किती जणांना तो भेटला. याचा प्रशासनातर्फे शोध सुरू आहे. जवळच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली जाणार आहे.

कल्याण वरून आलेल्या तरुणाला शुक्रवारी (ता. २२) कोरोनाची लक्षणे आढळली. त्याच दिवशी रात्री दहा वाजता त्याला,  नगर येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. त्यापूर्वी, त्याला कोणतीही लक्षणे आढळली नव्हती. त्याच्या क्लोज संपर्कात आलेल्यांची माहिती घेतली जात आहे. 

– डॉ. नलिनी विखे, तालुका आरोग्य अधिकारी, राहुरी.

सदर रुग्ण मुंबईतून रीतसर परवानगी घेऊन आला होता. त्याला आपण घरी जाऊ न देता, समाजात लगेच मिसळू न देता संस्थात्मक विलगीकरण केले होते. त्यामुळे इतर कोणाचीही चाचणी करण्यात येणार नाही. शासनाच्या धोरणाची व्यवस्थित अंमलबजावणी केल्यामुळे या रुग्णामुळे इतर कोणालाही बाधा पोहोचणार नाही.

– उर्जा मंत्री प्राजक्त तनपुरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here