श्रीरामपूर – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रस्त्याच्या कडेने चाललेल्या महिलेस ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने महिला ठार झाल्याची घटना सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहिणी दीपक आरोरा (वय ३०), असे मयत महिलेचे नाव आहे.
याबाबत शहर पोलिसांनी सांगितले, की शहरातील गोंधवणी येथे राहणाऱ्या रोहिणी या शिवाजी चौकातून चोथाणी हॉस्पिटलमध्ये निघाल्या होत्या. यावेळी त्यांना ट्रकने (एमएच १७ के २११) पाठीमागून जोराची धडक दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. जमलेल्या नागरिकांनी त्यांना तात्काळ साखर कामगार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच त्या मयत झाल्या होत्या.
याप्रकरणी दीपक आरोरा यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक किशोर नाना साळवे याच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.