प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
श्रीरामपूर: एका पोलिसाचे आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तरुणाने पोलीस चौकीसमोर येत स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. नजिम असे या तरुणाचे नाव असून तो गंभीर भाजला आहे. लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील पोलीस चौकीसमोर आज (दि. २५) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ आग विझवत तरुणाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. त्याला लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, पेटवून घेतलेला नजिम धान्याचा व्यापार, पार्किंग ठेका, अशी कामे करतो. त्यामुळे त्याचा पोलिसांशी संपर्क येत होता. हाच संपर्क त्याच्या घरापर्यंत पोहोचल्याचे बोलले जात आहे. संबंधित पोलिसाचे व नजिमचे नाजूक कारणावरून अनेक दिवसांपासून वाद होते. आजही त्याने त्या पोलिसाला फोन केले. फोनवर दोघांचे वाद झाले आणि त्यानंतर नजिमने पोलीस चौकीसमोर येत पेटवून घेण्याचा निर्णय घेतल्याचे नजिमच्या निकटवर्तीयांने सांगितले. पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी घटनास्थळी भेट दिली.