कोरोना कर्फ्यु : ‘त्या’ बधिताने दुचाकीवरून शहरभर मारला फेरफटका… आठ दिवसांसाठी शहर व परिसरात संचारबंदी..!

0

बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले संचारबंदीचे आदेश

शितलकुमार जाधव । राष्ट्र सह्याद्री

बीड: कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बीड शहरभर मोटरसायकल वरती फिरल्याचे निष्पन्न झाल्यावर बीडच्या प्रशासनाने पुढच्या आठ दिवसांसाठी बीड शहरामध्ये कडेकोट कर्फ्यु लावणार असल्याची घोषणा केली आहे. एका रुग्णाने बीड शहरात अनेक ठिकाणी मोटारसायकलवर भेटी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर पुढील आठ दिवस संपूर्ण बीड शहरात पूर्णत: कर्फ्यू लावण्याची घोषणा बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली आहे. त्यामुळे बुधवारी मध्यरात्रीनंतर आठ दिवस शहर पूर्णत: बंद राहणार आहे. बीड जिल्हा प्रशासनाने बीड शहरातील काही भाग कंन्टेन्मेन्ट झोन म्हणून जाहीर केले होते. त्यानंतर आता संपूर्ण बीड शहरच पुढील आठ दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. या काळात बीड शहरात संपूर्ण कर्फ्यू लागू करण्यात येणार असून मेडिकल दुकाने, दवाखाने, वगळता इतर सर्व सेवा बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या सर्व संबंधित क्षेत्रात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार ०८ दिवसांसाठी ४ जुन २०२० रोजी रात्री १२.०० वा पर्यंत संपूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत .

कारेगांव ता. पाटोदा येथील रुग्ण हा कोरोना विषाणूची लागण झालेला आढळलेला असून बीड शहरातील त्याचे तपास करत असतांना त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संपर्क बीड शहरात खूप मोठया प्रमाणात आला. ग्रामीण भागातही काही ग्रामीण त्याचा संपर्क आला असल्याचे याबाबतच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून संपूर्ण बीड शहरात व बीड तालूक्यातील खंडाळा, च-हाटा, पालवण व इट , पाटोदा तालूक्यातील वैजाळा व डोंगरकिन्ही, वडवणी तालूक्यातील देवडी, गेवराई तालूक्यातील खांडवी, मादळमोही व धारवंटा, केज तालूक्यातील खरमाटा व धारुर तालूक्यातील पारगांव या गांवामध्ये ०८ दिवसांसाठी संपूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे .

तसेच या ८ दिवसांमध्ये ४ जुन २०२० रोजी रात्री १२.०० वा पर्यंत संपूर्ण संचारबंदी कालावधीत घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली असून खालील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.

१.वैद्यकीय सेवा , वर्तमानपत्रे व माध्यमांविषयक सेवा २४ तास सुरु राहतील.
२. बीड शहरात व वरील गावांमध्ये विशेष परवानगी शिवाय कोणालाही या कालावधीत प्रवेश करता येणार नाही व शहरा बाहेरही जाता येणार नाही.
३. अत्यावश्यक सेवांची शासकीय कार्यालये वगळता (महसूल, ग्रामविकास व आरोग्य बीड शहरातील सर्व आस्थापना (शासकीय, खाजगी व बैंका इ.) बंद राहतील, परंतू बीड शहरातील शासकीय कार्यालयाचे विभाग प्रमुखांना व बँक यांना अतिशय आवश्यकता भासल्यास उपजिल्हाधिकारी रोहयो, बीड यांचेशी संपर्क साधून अत्यावश्यक बाब म्हणून कार्यालय उघडण्याची व अतिशय मर्यादीत कर्मचाऱ्यांनाच बोलविण्याची परवानगी घ्यावी.
४. बीड शहरातील व वरील गावांतील नागरिकांना इतर जिल्हयात व राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पास मिळणार नाही, पंरतू मेडीकल Emergencey मधील पाससाठी बीड शहरातील नागरिकांनी ऑनलाईन अर्ज www. covid19.mhpolice. in या वेबसाईटवर भरुन पास प्राप्त करुन घ्यावा.
५. बीड शहरातील व वरील गावांमधील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू अॅप तात्काळ डाऊनलोड करुन वापरणे बंधनकारक राहील, कोरोना विषाणूचे अनुषंगाने (ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी व श्वसनास त्रास इ.) लक्षणे
आढळून आल्यास सदरील अॅप मध्ये Self Assessment या सदराखाली आपली माहिती तात्काळ भरावी.
६. बीड शहर व वरील गांवे वगळता जिल्हयातील इतर सर्व भागांमध्ये या आधी दिलेले आदेशच कायम राहतील
राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ में २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३१ में २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वीचे या कार्यालयाचे आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here