प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
राहुरी तालुक्यातील महसूल विभागाने लॉकडाऊन काळातही वसुलीत आघाडी घेतल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उद्दिष्टपूर्ती केल्याचे दिसून येत आहे. तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली 90 टक्के वसुली पूर्ण करण्यात आली.11 कोटी 50 लक्ष रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट असताना राहुरी महसूल विभागाने 10 कोटी 44 लक्ष 24 हजार 638 रुपये सरकारी तिजोरीत जमा केले आहे.
राहुरी तालुक्यामध्ये सन 2019 -20 या आर्थिक वर्षाच्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी तहसीलदार शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार गणेश तळेकर, छाया चौधरी, अण्णासाहेब डमाळे यांनी वसुलीसाठी विशेष नियोजन केले. त्यानुसार मंडलाधिकारी व तलाठ्यांनी अडचणींचा सामना करीत एकीकडे पंचनामे, शासकीय योजनांची पूर्तता करताना वसुलीसही हातभार लावला.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशान्वये सुमारे 11 कोटी 50 लक्ष रुपये वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामध्ये जमीन महसूल, नगरपरिषद कर, शिक्षणकर असे मिळून 3 कोटी रुपये, गौणखनिज वसुलीचे 8 कोटी 50 लक्ष रुपये होते. एकीकडे वाळू लिलाव ठप्प, तर दुसरीकडे निर्माण झालेल्या संकटाला तोंड देताना राहुरी महसूल विभागाला उद्दिष्ट साध्य करणे जिकरीचे होते. परंतू तहसीलदार शेख यांचे नियोजन व सहा मंडलाधिकारी व 96 तलाठ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
मागील आर्थिक वर्षात तलाठ्यांना गावामध्ये अटल पेन्शन योजना, पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे कामकाज होते. तसेच अतिवृष्टी, ढगफुटीबाबत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचेही काम करावे लागेल. हे सर्व कार्य करीत असतानाच महसूल प्रशासनाने शासनाच्या तिजोरीमध्ये 10 कोटी 44 लक्ष 24 हजार 638 रुपये जमा केले. 90 टक्के उद्दिष्टयपूर्ती जमीन महसूल, शिक्षणकराच्या 3 कोटी रुपयांच्या उद्दिष्टापैकी 2 कोटी 92 लक्ष 33 हजार 676 रुपये वसूल केले आहेत.
गौण खनिजाची वसुली वाळू लिलावांच्या माध्यमातून करणे गरजेचे होते. परंतू यंदा मुळा व प्रवरा नद्या वाहतच होत्या. ज्या ठिकाणी वाळू साठा होता, तेथून वाळू लिलावास विरोध झाला. त्यामुळे गौणखनिज वसुलीसाठी मातीमिश्रीत वाळू लिलाव, अवैध गौण खनिज वाहतूक करणारी वाहने पकडणे आदी महत्वाची कामे महसूल विभागाने पार पाडली. त्यामुळे गौण खनिजाचे 8 कोटी 50 लक्ष उद्दिष्ट साध्य करताना राहुरी महसूल विभागाने 7 कोटी 51 लक्ष 90 हजार 962 रुपये वसुली पूर्ण केली आहे.महसूल विभागाने गतवर्षी 90 टक्के लक्ष लक्षवेधी वसुली केली आहे.
महसूल वसूलीचे सर्व टिमचे यश ; शेख
कोरोनो संसर्गजन्यच्या लॉकडाऊन कालावधीत राहुरी महसूल विभागाने एका टिम प्रमाणे काम केले आहे. वसुलीसाठी मंडलाधिकारी व तलाठ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. राञी अपराञी अवैध गौण खनिज लूट करणाऱ्यांवर सर्वांनी एकी दाखवित कारवाई केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजही महसूल विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी दक्ष आहेत. तलाठी आपल्या गावांमध्ये चोख भूमिका बजावत आहेत. सर्वांच्या मेहनतीने कोरोनो हद्दपार करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती तहसीलदार फसियोद्दिन शेख यांनी दिली आहे.
गौण खनिजचा तो दंड वसूल केला नाही.
राहुरी महसूल विभागाने वांबोरी हद्दीत अवैध गौण खनिज उत्खनन होत असताना जेसीबी, दोन डंपर जप्त केले.परंतू या प्रकरणी पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल नाही.तसेच 14 लाखांचा दंड आकारुन तो वसूलही केला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, वाळू तस्करीच्या कारवाई वेळी दोन तलाठ्यांना लाच घेताना पकडण्यात आले. परंतू वाळू चोरी झाली म्हणून महसूल विभागाने संबंधितांवर गुन्हे दाखल करणे गरजेचे होते. परंतू त्यातही गुन्हा दाखल नसल्याने उलट सुलट चर्चा सुरु आहे.