कोरोणा रूग्णावरून पालिकेत गोंधळ!
अनिल पाटील । राष्ट्र सह्याद्री
कोल्हापूरः
मुरगुड शहरात काल बुधवारी सापडलेला पहिला कोरोना बाधित २० वर्षीय रुग्ण हा प्रशासनाने कागदोपत्री संस्थात्मक क्वारंटाईन दाखवला तथापि, प्रत्यक्षात हा रुग्ण केवळ एकच दिवस कन्या विद्यामंदिर या शाळेमध्ये क्वारंटाईन असल्याचे पुरावे देत नागरिकांनी आज नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना पालिकेत जाऊन घेराव घातला. यावेळी प्रचंड गोंधळ झाला.
पालिका प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप करत संपूर्ण पालिकाच क्वारंटाईन करण्याची मागणी नागरिकांनी केली. यावेळी झालेल्या घोषणाबाजीत मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्यावर नागरिकांनी चप्पलफेक केली.
येथील आंबेडकरनगरातील एका २० वर्षीय तरुणाचा कोरोनाचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला आहे.देश लॉक डाऊन झाल्यानंतर ७० दिवसांनी मुरगूड शहरात कोरोना बाधित रुग्ण सापडला आणि एकच खळबळ उडाली आहे.या पार्श्वभूमीवरच मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना नगरपालिकेच्या दारात नागरिकांनी घातला घेराव.नागरीक संतप्त झाले. गोंधळ सुरु झाला. कोणत्या अधिकाराने या तरुणास नगरपालिकेने घरात राहण्याची परवानगी दिली? या रुग्णांचा अहवाल पालिकेला प्राप्त झाला होता? त्याला संस्थात्मक क्वारंटाईन किती दिवस केले होते? मग तो गल्लीत कसा काय फिरत होता? शहरातूनही तो फिरला असल्याचे नागरिकांनी पालिका प्रशासनाच्या व मुख्याधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले? यावेळी प्रचंड घोषणाबाजी करत नगरपालिका प्रशासन मुख्याधिकारी यांच्या अधिकाराच्या नागरिकांनी घोषणा दिल्या त्याचबरोबर पालिका प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप करून संपूर्ण पालिका करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
जीवाशी खेळता काय? नागरिकांचा सवाल
यावेळी मुख्याधिकारी संजय गायकवाड, नगराध्यक्ष राजस्थान जमादार यांच्या विरोधी घोषणा देत नागरिकांनी गोंधळ घातला. तर काही नागरिकांनी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या दिशेने चप्पल फेकली. यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. पण त्या वेळी नागरिकांनी पोलिसांना तुम्ही सांगू नका आमच्या जीवाशी खेळता काय? असा सवाल केला. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात नागरिकांना पालिकेतून बाहेर काढण्यात आले. यावेळी बाहेर नागरिक प्रचंड घोषणाबाजी करत होते.