प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
श्रीगोंदा – तालुक्यात प्रत्येक गोष्ट हटकेच असते. कोणते आंदोलन असो नाही तर सभा. प्रत्येक गोष्टीत वेगळेपण जपण्याची परंपरा श्रीगोंदे तालुक्यात आहे. मित्र कोरोनामुक्त झाल्यावर त्याचे स्वागतही हटकेच झाले. कोरोनापेक्षा त्याचीच चर्चा जास्त आहे. श्रीगोंदे फॅक्टरीवरील कोरोनाबाधित तरुण आजारावर मात करुन आज घरी परतला. तो येणार हे समजले आणि त्याच्या घराजवळ मित्र आणि नातेवाईक जमले. त्याला घेवून येणारे वाहन आले आणि लोकांनी टाळ्यांचा गजर सुरु केला. तो उतरल्यावर त्याच्या फुलांचा वर्षाव झाला तर काही उत्साही मित्रांनी त्याला अलिंगन देत आनंदोत्सव साजरा केला.

हा सगळ्या आनंदाचा व्हि़डिओ लगेच सोशल मीडियात टाकण्यात आला. देवाक काळजी रे… असे दर्दभरे गीत टाकून त्या कोरोनामुक्त तरुणाच्या परतण्याचा आनंद व्यक्त झाला. पुणे येथील घोरपडी भागातून आलेल्या श्रीगोंदे फॅक्टरी येथील त्या तरुणाला कोरोनाने गाठले होते. तो तालुक्यातील पहिला कोरोना रुग्ण आहे. त्याच्यामुळे त्याच्या दहा वर्षाच्या पुतण्यालाही कोरोना झाला होता. मात्र दोघांनीही कोरोनावर मात केली.
हा तरुण आज फॅक्टरीवर परतला. दुपारी त्याला खास सरकारी वाहनातून फॅक्टरीवरील त्याच्या घरी आणण्यात आले. मात्र रस्त्यातच त्याच्या स्वागतासाठी थांबलेल्या मित्र व परिवारातील लोकांनी त्याच्या आगमनाचे जंगी स्वागत केले. सगळ्यांनी टाळ्या वाजविल्या तर काहींनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली. काही उत्साही मित्रांनी थेट अलिंगन देत त्याच्या परतण्याचा आनंद साजरा केला. श्रीगोंद्यासह परिसरात या जंगी स्वागताची चर्चा सुरू आहे.