!!भास्करायण:१७!!
आंधळं दळतंय,कुत्रं पीठ खातंय….

0

Rashtra Sahyadri Article…

वाटायचे कणभर आणि लाटायचे मणभर, असाही प्रकार घडत आहेत. स्थलांतरितांसाठी वितरित होणारे तांदुळ, दाळ व्यापा-यांना विकून मोठी कमाई शासकिय आधिकारी व त्यांचे नेहमीचे हस्तक बिनधोकपणे करित आहेत. नियमित धान्य वाटपात हात धुणाऱ्या यंत्रणेला कोरोनाची आपत्ती ही इष्टापत्ती वाटावी, केवढा हा निर्लज्जपणा !


लातूर, किल्लारीचा सन १९८३मधील विनाशकारी आणि हजारो लोकांचा बळी घेणारा भूकंप सर्वांना आठवत असेल.या भूकंपाची आठवण जरी झाली,तरी अंगावर शहारा येतो.आता या घडीला या भूकंपाची याद येण्याचं कारण खूप वेगळं आहे. किल्लारीचा भूकंप झाला तेव्हा जगभरातील देशांतून अन्नधान्य, रोकड, अंथरुण, पांघरुण आणि घालायचे कपडे,अशा मदतीचा ओघ सुरु झाला. सदरची मदत भूकंपग्रस्तापर्यन्त पोचविण्याची जबाबदारी शासन यंत्रणेकडे होती.
भूकंपग्रस्तांच्या मदत कार्यात सैन्य, पॕरा मिलिटरी फोर्सेस, पोलिस, राखिव पोलिस दल यांसह महसूल व इतर विभागाचे लहानमोठे अधिकारी तैनात होते. भारतीय जवानांनी नेहमीप्रमाणे गौरवास्पद कामगिरी बजाविली.

एकीकडे माणुसकीचे दर्शन घडत असताना दुसरीकडे मानवतेने शरमेने मान झुकवावी, असे घृणास्पद कृत्य घडत होते. परदेशातून जी कपड्यालत्त्याची मदत आली, ते कपडे उच्च दर्जाचे होते. ब्लॕंकेटसही उबादार व अप्रतिम होते. सदरचे कपडे आणि ब्लँकेटस् पळविण्याचे काम आपल्या शासन यंञणेतील काहिंनी केले! विशेष म्हणजे यात उच्च पदस्थ सनदी अधिकारी सहभागी होते, केवढा हा निलाजरेपणा! मढ्याच्या टाळूवरचं लोणी कसं खातात, त्याचे हे घृणास्पद उदाहरण.


याची आठवण यायचं कारणही तसंच आहे. देशात सध्या कोरोना महामारीने थैमान घातले आहे.हजारोंचे बळी जात आहेत.लाखोंचे रोजगार बुडाल्याने त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. कितीजणांची उपासमार होत आहे,त्याची मोजदाद नाही.एका अर्थाने हे मानवतेवरचे संकट आहे. अशा बाक्याप्रसंगी केन्द्र व राज्य शासनाकडून सर्व विकासकामांना कात्री लावून,कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी आर्थिक व वस्तु स्वरुपातील मदतीचा प्रचंड ओघ सुरु झाला आहे. हा ओघ बघून शासन यंञणेतील अनेकजण जिभाल्या चाटू लागल्याची दबक्या आवाजात कुजबूज सुरु झाली आहे.
कोरोनासाठी शासनाने तिजोरीच उघडली आहे.या उघड्या तिजोरीभोवती ताव मारण्यासाठी काही सराईत शासकिय गिधाडे घिरट्या घालित आहेत. कोरोनासाठी लाखो कोटी खर्ची पडत आहेत. यातून मेडीकल साहित्य, पी.पी.ई(पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंटस्) औषधे, व्हेंटिलेटर्स अशा अत्यावश्यक वस्तुंची, उपकरणांची खरेदी होत आहे. याचबरोबर शालेय इमारतीसारख्या सार्वजनिक इमारतींचे हाॕस्पिटल्समध्ये रुपांतर केले जात आहे. तेथे प्राथमिक वस्तुंपासून सर्व आवश्यक उपकरणांची उपलब्धता केली जात आहे.

अनेक ठिकाणी शेडस् उभारुन तेथे तात्पुरती रुग्णालये तयार केली जात आहे. अशाठिकाणी काॕटस्, गाद्या, उश्या, पांघरुणे, बेडशिटस् पासून तर आॕक्सिजन सिलिंडर्स व पाईपलाईन्स,सलाईन स्टॕण्डस आदी साधनसामग्री खरेदी केली जात आहे. यात कुठेही हात आखडताना केन्द्र वा राज्य शासन दिसत नाही. आजपावेतो कोट्यावधीची खरेदी झालेली आहे आणि यापुढेही होणार आहे. काहि रकमेपर्यन्तच्या खर्चाचे अधिकार सनदी अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत. येथेच काही ठिकाणी पाणी मुरायला सुरुवात झाली आहे!सुस्तावलेल्या मुर्दाड शासन यंत्रणेतील किल्लारी प्रवृत्तीचे टोळ, अंग झटकून सरसावले आहेत. ही टोळधाड गरजूंच्या मदतीचे लचके तोडायला सिध्द झाली असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत.
दुसरीकडे गरजुंना, त्यातल्यात्यात स्थलांतरितांना मोफत धान्य पुरविले जात आहे. यातही शासकिय अधिकारी मध्यस्थांमार्फत ताव मारीत असल्याचेही ऐकिवात आहे. कारण स्थलातरितांची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही. हे चतुरांनी जाणले आहे. त्यामुळे वाटायचे कणभर आणि लाटायचे मणभर, असाही प्रकार घडत आहेत. स्थलांतरितांसाठी वितरित होणारे तांदुळ, दाळ व्यापा-यांना विकून मोठी कमाई शासकिय आधिकारी व त्यांचे नेहमीचे हस्तक बिनधोकपणे करित आहेत. नियमित धान्य वाटपात हात धुणा-या यंत्रणेला कोरोनाची आपत्ती ही इष्टापत्ती वाटावी, केवढा हा निर्लज्जपणा !


कोरोनाची आपत्ती एवढी आहे की, शासकिय रुग्णालये कमी पडत आहेत. त्यामुळे काहिंना खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.तेथेही असाच प्रकार घडात आहेत.अनेक खासगी रुग्णालये लाखो रुपयांच्या बिलाची आकारणी करुन आपले उखळ पांढरे करुन घेत आहेत. मास्क व सॕनिटायझर्सचा काळाबाजार होत आहे. यावर शासनाचे काहिच निर्बंध नाही. शासन न्याय देत नसेल तर शेवटी धाव घ्यावी लागते ती न्यालयाकडे. रुग्णांचे प्राण वाचविणे हे कर्तव्य असणा-या डाॕक्टरांना अव्वाच्या सव्वा उकळण्याइतका निर्दयीपणा यावा, यापरती मानवतेची शोकांतिका नाही.

तरं हे सगळं आसं चाललंय. अनेक डाॕक्टर्स् कोरोना संसर्गाचा धोका पत्करुन उपलब्ध साधनांनिशी रुग्णांचे प्राण वाचवित आहेत. अनेक आरोग्य कर्मचारी परिचारिका भगिनी., वाॕर्ड कर्माचारी, अॕम्ब्युलन्स चालक गौरव वाटावा अशी देशाची सेवा करित आहेत. लाखो पोलिस कर्मचारी घरदार सोडून इतरांची घरदारे, मुलंबाळे सुरक्षित राहावित म्हणून रात्रीचा दिवस करित आहेत. अनेक सेवाभावी संस्था, समाजसेवक, दानशूर आपल्यापरिने मदतीचा हात पुढे करित आहेत. या सर्वाच्या कार्याला सलाम करताना मान गौरवाने उंचावते. एकिकडे असे आसताना दुसरीकडे काही शासकीय टोळधाड सरसवली आहे. ही टोळधाड नियंत्रणात आशी आणायची? कारण जो तो आपापल्या कामात आहे. कोरोनाशी आपल्यापरीनं लढत आहे. त्यामुळे या टोळांचं फावणार आहे. एकूणच आंधळं दळतंय आणि कूञ पीठ खातंय आशी आवस्था आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here