Newasa : अन् या कलाकाराने दगडांकडून वदवले कोरोना जनजागृतीचे बोल…

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री  

नेवासा – कोरोनाविषयक जनजागृतीसाठी चित्रकार भरतकुमार उदावंत यांच्या कलाकुसरीतून रस्त्यावर पडलेला दगड ही बोलू लागला आहे. नेवासा शहर व परिसरात मुख्य रस्त्यांवर मिळेल त्या जागेवर झाडांच्या खोडावर कोरोना विषयक जनजागृती चित्राच्या माध्यमातून साकार करणाऱ्या चित्रकार भरतकुमार उदावंत या कोरोना योद्ध्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नेवासा फाटयापासून शेवगाव रोडवर सुमारे पाच किलोमीटर अंतरावर दगडी शिल्पासाठी प्रसिद्ध असलेल्या “भानसहिवरे” गावाजवळ रस्त्याच्या कडेला मोठमोठे दगड पडलेले होते. ते पाहून चित्रकार उदावंत यांना यावर चित्रे काढून कोरोनाच्या विषयक जनजागृती केली तर मोठे काम होईल, असा विचार आला. हा विचार मनात ठरवून त्यांनी या अभिनव कार्याला सुरुवात केली. भानसहिवरा ते नेवासाफाटा परिसरातील नेवासा शहराकडे येणाऱ्या रस्त्यांवर आज चित्रकार भरतकुमार उदावंत यांनी रेखाटलेल्या चित्रकलाकृती दुचाकी चारचाकीवरील नागरिक व पादचारी यांच्यासाठी आज मोठे आकर्षण बनले आहे.

मास्क वापरा, एकमेकांच्या हाताला स्पर्श करू नका, सोशल डिस्टनसिंगचे पालन करा, गर्दी टाळा, सुरक्षित अंतर ठेवा, वारंवार स्वच्छ हात धुवा अशी अक्षरे दगडावर कोरून दगडाला ही कोरोनाच्या या संकटात बोलके केले आहे. कोरोनाच्या या लढाईत आज प्रत्येकजण खारीचा वाटा उचलत असून डॉक्टर, पोलीस, प्रशासकीय यंत्रणा, नर्स, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, कर्मचारी, युवकासह, पत्रकार, आशा स्वयंसेविका, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते ज्या प्रमाणे योगदान देत आहे. त्याच प्रमाणे नेवासाफाटा परिसरात गाडेनगर येथील परिसरात रहात असलेले चित्रकार भरतकुमार उदावंत व त्यांचे चिरंजीव चित्रकार सत्यजित उदावंत हे पितापुत्र देखील कोरोनाच्या या लढाईत चित्राच्या माध्यमातून योद्धे बनून पुण्याचे व प्रबोधनाचे कार्य करत आहे.

“कोरोनाची जनजागृती”करीता उदावंत यांच्या या कलाकुसरीच्या जोरावर नागरिकांबरोबर दगडही बोलू लागले आहे. त्यातून सहज नजरेस पडून कोरोना विषयक सरकारी सूचनांचे पालन होऊन करोना बाधित होऊ नये म्हणून जनजागृती होईल याच हेतूने बोलकी दगडाची निर्मिती त्यांनी केली. त्यांच्या या जनजागृती उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here