प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
पुणतांबा : परिसरातील पुणतांबा-रामपूरवाडी-येलमवाडी-जळगाव-चितळी सह अनेक गावातील ग्रामस्थांना दळणवळणाच्यादृष्टीने अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणार्या जळगाव – चितळी या अंदाजे 2 कि.मीटर लांबीच्या रस्त्याच्या प्राथमिक कामांना सुरुवात झाल्यामुळे आणखी तीन चार महिन्यात तरी काम मार्गी लागेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी आ. सौ. स्नेहलता कोल्हे यांनी ऑगष्ट 2019 मध्ये या रस्त्याचे भूमीपूजन केले होते. त्यानंतर पावसाळ्याचे निमित्त व विविध सबबी सांगून ठेकेदाराने जाणीवपूर्वक रस्त्याचे काम सुरु केले नाही. पाच महिन्यापूर्वी चितळी फाटयाच्या बाजूने काही ठिकाणी खडी टाकली होती. तसेच दोन दिवस जेसीबीच्या साह्याने रस्त्याच्या साईडपट्टयांचे काम सुरु केले होते; मात्र मार्चमध्ये लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर पुन्हा बंद पडले होते. खडीकरण, रूंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण असलेल्या या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी सातत्याने मागणी ग्रामस्थांनी सौ. कोल्हे यांच्याकडे केली होती. दैनिक राष्ट्र सह्याद्रीने सुध्दा रस्त्याचे काम सुरू करण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर दोन दिवसापासून रस्त्यावर दोन ठिकाणी असलेल्या पुलाचे काम सुरू झाले आहे. नळ्या टाकून नंतर पुलाचे बांधकाम सुरु झाले तर ज्या ठिकाणी नळ्या टाकणे आवश्यक आहे तेथेही नळ्या आणून टाकण्यात आल्या आहेत. सध्या जळगाव -चितळी रस्त्याची अवस्था दयनीय झाली ऊसून लवकर कामे पूर्ण करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.