विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
मुंबई : येत्या दोन- तीन दिवसांत महाराष्ट्रात मॉन्सून धडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात 9 ते 11 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मोसमी वारे कर्नाटक व गोवा ओलांडून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मोसमी वारे सध्या गोव्याजवळ कर्नाटकातील कारवारपर्यंत दाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये कर्नाटकातील काही भाग व तामीळनाडूतील काही भागांत मोसमी वार्यांनी प्रगती केली आहे. पोषक वातावरणामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत तळकोकणातून मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा जून ते सप्टेंबर या मॉन्सून काळातील सरासरीच्या 102 टक्के पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने आपल्या सुधारित अंदाजात वर्तवली आहे. मॉन्सूनसाठी संपूर्ण हंगामात हवामान अनुकूल राहणार असल्यामुळे सरासरीइतक्या पावसाची शक्यता असल्याचे अंदाजात म्हटले आहे. वायव्य भारतात यंदा त्या भागातील हंगामी सरासरीच्या 107 टक्के, महाराष्ट्राचा समावेश असणार्या मध्य भारतात सरासरीच्या 103 टक्के, दक्षिण भारतात 102 टक्के, तर ईशान्य भारतात 96 टक्के पावसाची शक्यता आहे.