Crime : बहीण-भावाच्या हत्याकांडाने औरंगाबाद हादरले

0

दीड किलो सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटली

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

बहिण भावाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करून मारेकऱ्यांनी बंगल्यातील दीड किलो सोन्याचे दागिने आणि रोख साडेसहा हजार रुपये लुटून नेल्याची खळबळजनक घटना सातारा परिसरातील कनकोरबेन नगरात मंगळवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह घाटी रुग्णालयात हलविले. किरण लालचंद खंदाडे – राजपूत (वय १८ वर्ष) आणि सौरभ लालचंद खंदाडे – राजपूत (वय १६ वर्ष) अशी हत्या झालेल्या बहिणभावाची नावे आहेत.

याविषयी प्राप्त माहिती अशी की, सातारा परिसरातील कनकोरबेन नगरमध्ये २०१७ पासून बंगला भाड्याने घेऊन लालचंद खंदाडे हे पत्नी, मुली सपना (२१), किरण (१८) आणि मुलगा सौरभ याच्यासह राहत आहेत. त्यांची पत्नी एलआयसीची विमा प्रतिनिधी आहे. खंदाडे परिवाराची जालना जिल्ह्यातील पाचनवडगाव येथे शेती आहे. खंदाडे हे शेती व्यवसाय करतात.
लालचंद यांनी बोलावल्यामुळे मंगळवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमाराला पत्नी आणि मोठी मुलगी सपना हे कारने पाचनवडगावला गेले होते. तर किरण आणि सौरभ हे घरीच थांबले होते. दुपारी १:२२ वाजता किरणने तिच्या आईला फोन करुन जेवण झाले का विचारले होते. रात्री ८:३० वाजेच्या सुमारास लालचंद यांची पत्नी, मुलगी सपना आणि सासू औरंगाबादला परतल्या तेव्हा त्यांनी गेटमधून मुलांना आवाज दिला. मात्र, आतून प्रतिसाद आला नाही. बंगल्याचे दारही लोटलेले होते. सर्वजण आत गेले तेंव्हा त्यांना बाथरुममध्ये किरण आणि सौरभ रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेले दिसले. दोघांचे गळे धारदार शस्राने कापलेले तसेच डोक्यावर जखमा होत्या. शिवाय घरातील दीड किलो सोन्याचे दागिने असलेली बॅग आणि रोख साडे सहा हजार रुपये चोरीला गेल्याचे त्यांना दिसले.

या घटनेची माहिती त्यांनी फोन करुन गावी असलेल्या लालचंद यांना आणि पोलिसांना कळविण्यात आले. पोलीस अधिकाऱ्याना या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, पोलीस उपायुक्त मीना मकवाना, सहायक आयुक्त हनुमंत भापकर, सातारा ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाले, गुन्हेशाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड आणि अन्य अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. सोबत ठस्से तज्ज्ञ पथक आणि न्याय वैद्यक शाखेचे पथकाला पाचारण केले. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मयत किरण आणि सौरभ यांना कॅरम खेळाची आवड होती. यामुळे त्यांच्या घरातील एका खोलीत कॅरम बोर्ड होता. दोघे बहीण भाऊ कॅरम खेळताना मारेकरी त्यांच्या बंगल्यात घुसले असावे, यामुळे कॅरमचा खेळ अर्धवट राहिल्याचे कॅरम बोर्ड वरुन दिसत होते . सौरभ दहावीत तर किरण होती पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत होते. सौरभ येथील पोद्दार शाळेत दहावीत शिकत होता . त्याने दहावीची परीक्षा दिली होती तर किरण ही पुण्यातील मॉर्डन कॉलेजमध्ये बी ए प्रथम वर्षात शिकत होती .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here