!!भास्करायण :१९!! ‘दृष्टी’ दान देगा मानवा…

0

Rashtra Sahyadri Special Article...

जागतिक नेत्रदान दिन विशेष

जागतिक नेत्रदान दिन. यानिमित्ताने ‘‘निशदिन ढाळी एकच चिंता मजला ही आनिवार, दाटला चहुकडे अंधार’’… शालेय पाठ्यपुस्तकातील ही कविता आठवली. या कवितेचा अर्थ बालपणी समजणे शक्यच नव्हते.आता माञ ती कविता अंगावर शहारे आणते. डोळ्यावाचून जगणं ही कल्पनाच करता येत नाही. उजेडाला सरावलेले आपण. रात्री अचानक दिवे मालवण झाली, तर क्षणभरच्या अंधाराला भितो. पळभरचा अंधार नकोसा आणि जिवघेणा वाटतो. उजेडासाठी आपण आतूर होतो. कासावीस होतो. आपण डोळस आहोत. आपल्याला उजेडाची आदत जडलीय; म्हणून आपण अंधार पडला की कावरेबावरे होतो. इथं तर आयुष्यभरचा अंधार! अंधार हेच वास्तव, अंधार हेच जीवन, अंधार हाच स्पर्श, अंधार हाच आकार आणि अंधार हेच विश्‍व!
या विश्‍वात दुर्दैवी अंध माणसे , अंधाराचे दान पदरी घेवून सृष्टीवर वावरत असतात.
असं दान पदरी पडलेलं असतानाही अशी कोणती शक्ती असते, की डोळसांपेक्षाही काकणभर अधिक जगण्याची उमेद या शापितांमध्ये असते? कोठून येते इतके बळ? क्षणभरच्या अंधाराने, तसूभर संकटाने आपण उजेडातही चाचपडतो. अंधेरी दुनियेचे हे प्रवासी मात्र अंधाराला बाजूला सारीत प्रवास करतात. प्रवासताना डोळसांना अधाराला भिऊ नकोस असा संदेश देत असतात. जगण्याला अर्थ प्राप्त करुन देत असतात. हा अर्थ शोधण्याचा जो कोणी डोळसपणे आणि सृजनशिलतेने करील, तो ह्या अंधेरी दुनियेच्या प्रवाशांना सलाम केल्याशिवाय राहाणार नाही.
जीवन आणि मृत्यू ही ठरलेली निरगती आहे. जन्माला येण्यापासून सुरु झालेला प्रवास हा मृत्यूपाशी थांबतो, हे ठाऊक असूनही आपण मृत्यूला घाबरतो. जगण्याला कवटाळतो. याचं कारण मृत्युचं भय हे नसतं, तर हे जग पुन्हा बघायला मिळणार नाही, ही मानसिक भिती मनात दडलेली असते, अशी कोणतीही भिती ह्या अंधाराच्या सम्राटांना नसते, हीच त्यांच्या जगण्याची प्रेरणा ठरते. त्यामुळेच हे सम्राट अंधाराच्या साम्राज्यातही राजेपण भोगतात. याउलट आपण प्रकाशाच्या साम्राज्यातही भिकारीच ठरतो. जन्माला येतो, जगतो आणि प्रवास संपवून निघून जातो. मागे काय? केवळ अंधार. याउलट दृष्टी नसतानाही सृष्टी उपभोगणारे हे जीवनयात्री आयुष्यभर अंधाराशी मैत्री करुन जगतात. जातात; पण प्रकाशाच्या वाटा मागे ठेवून!
हे सगळं ठीक आहे. वाचायला, लिहायला सोपं आहे. पण दृष्टी नसताना जगणं खरंच इतकं सोपं आहे? नक्कीच नाही. असं जगणं कोणाच्याही पदरी पडू नये. दृष्टीचं दान नसतानाही, जे इतरांना जगण्याचा डोळसपणा देतात. त्यांना आपण हयातीत नसलो, तरी हयातीनंतर कां होईना प्रकाश देवू शकणार नाही? सृष्टी पाहून तृप्त होवून परतीच्या प्रवासानंतर ह्या अंध प्रवाशांना दृष्टीचं दान देवून सृष्टीचं सौंदर्य दाखवू शकणार नाही? जगताना दान देणं विसरलो असू, तर मरताना दान द्यायला काय हरकत आहे? जाणार तर आहोतच, जावं तर लागणारच; पण जाता जाता दृष्टीचं दान दिलं, तर जगण्याचं सार्थक होईल. ‘मरावे परी नेत्ररुपी उरावे’ या सृजनशिलतेतून जाता जाता सर्व डोळसांना ‘दृष्टीदान देगा मानवा कारण तुझा विसर ना व्हावा !!

भास्कर खंडागळे
बेलापूर,
(९८९०८४५५५१ )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here