प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
शेवगाव – वेट अँड जॉय वॉटर पार्क लोणावळा आयोजित महाराष्ट्र ऑनलाईन सुपरस्टार स्पर्धेत येथील शर्वरी बाळासाहेब देशपांडे हिने प्रथम क्रमांक मिळवून गायन क्षेत्रात शेवगावचे नाव झळकवले आहे. तालुक्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील 190 स्पर्धक सहभागी झाले होते. सहभागी स्पर्धकाने कोणत्याही प्रकारची अद्ययावत साधने अथवा इतर यंत्रसामग्री न वापरता आहे त्याच परिस्थितीमध्ये आपल्या कलाकृतीचा व्हिडिओ ऑनलाईन पाठवायचा होता. त्या व्हिडिओची योग्यता तपासून आयोजकांनी त्यांच्या पसंतीनंतर स्पर्धकाने पाठवलेला व्हिडिओ आयोजकांच्या यू ट्यूब चॅनलवर प्रेक्षकांना पाहता येत होता. प्रेक्षकांना लाईक करण्याचा पर्याय देण्यात येऊन वोटिंग करण्याचे आवाहन केलेले होते.
प्रेक्षकांनी केलेल्या वोटिंगच्या बळावर शर्वरी विजेती ठरली. शेवगावकरांनीही गायन कलेची आवड असलेल्या शर्वरीला मतदान केले. शर्वरीला अभ्यासाबरोबरच गायन, नृत्य, स्पोर्टस् ची आवड असल्याने ती आवर्जून मोबाईलमध्ये गुंग राहण्याऐवजी या कलेसाठी वेळ देते. ती येथील उद्योजक बाळासाहेब देशपांडे यांची कन्या आहे.
या स्पर्धेकरिता स्पर्धकास लाईक(वोटींग) करिता ८ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. १ ते ८ जूनपर्यंत जास्तीत जास्त लाईक (वोटींग) तपासून ८ जूनला मध्यरात्री या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. विजयी स्पर्धकाची कागदपत्रे पडताळणी करून बक्षीस म्हणून अॅपल आय फोन दिला जाईल, असे आयोजकांनी सांगितले.