प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
जालना – केंद्र सरकारने राज्याला 28 हजार कोटींची मदत देऊनही कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले, अशी टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
येथील मातोश्री लॉन्समध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, बाजार समितीचे उपसभापती भास्कर दानवे, माजी जिल्हाधक्ष रामेश्वर पाटील भांदरगे,भाजपाचे शहराध्यक्ष तथा जालन्याचे उपमगराध्यक्ष राजेश राऊत, माजी उपनगराध्यक्ष सुनीलबापू आर्दड,माजी शहराध्यक्ष सिद्धिविनायक मुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोनाच्या साथरोगाने जगभर थैमान घातले. या साथरोगाचा सामना करताना जगातील प्रमुख चौदा महासत्ता असलेले देशही हतबल झाले. या चौदा देशांची एकूण लोकसंख्या एकट्या भारताच्या लोकसंख्येएवढी आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरोधात राबविलेल्या उपाययोजनांमुळे या महासत्ता देशांपेक्षा कोरोनाचे प्रमाण व त्यामुळे होणा-या नुकसानाचे प्रमाण कमी ठेवण्यात यश आले.शिवाय कोरोनाचा शरीरावर दुष्परिणाम कमी करणारी औषधीही भारताने काही देशांना दिली. कोरोनाची लागण होऊ नये, यासाठीच्या औषधींचा शोध लावण्याचे काम इतर राष्ट्रांप्रमाणेच भारतातील प्रयोगशाळांमध्ये सुरू आहे, असेही लोणीकर म्हणाले.