Kada : अवैध दारुबंदीसाठी डोईठाण ग्रामसभेचा ठराव कागदावर

0
पोलिसांकडून अद्याप कार्यवाही होताना दिसेना
कडा – डोईठाण गावांतर्गत अवैध दारु विक्री होत असल्यामुळे गावाची शांतता भंग पावत चालली असून ग्रामपंचायतीने एक वर्षापूर्वी दारूबंदी संदर्भात ठराव घेतला. मात्र, पोलिसांकडून कसलीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे गावांतर्गत अवैध दारुची विक्री तात्काळ बंद करावी, अशी मागणी थेट पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
आष्टी तालुक्यात डोईठाणसह परिसरात पोलिसांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात विविध अवैध धंदे फोफावले आहेत. कोरोना टाळेबंदीचा कुठलाही परिणाम झालेला दिसत नाही. त्यामुळे अवैध धंद्यांचा सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास वाढला आहे. तर दुसरीकडे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डोईठाण ग्रामपंचायत हद्दीत अवैध दारु विक्री होत असल्यामुळे सामाजिक शांततेला बाधा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे डोईठाण ग्रामपंचायत कार्यालयात गावच्या सरपंच वंदना युवराज तरटे यांच्या अध्यक्षतेखाली एक वर्षापूर्वी दारुबंदीचा एकमताने ठराव घेण्यात आला.
मात्र, अद्याप आष्टी पोलिसांकडून कसलीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे उलट अवैध धंदे बिनबोभाट चालूच आहेत. डोईठाण गावातील दारुबंदी करण्याबाबत पोलिस अधीक्षक, विभागीय अधिकारी, पोलिस निरिक्षक आदींना निवेदनाच्या प्रति देण्यात आल्यामुळे आष्टी पोलिसांच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here