Kada : राज्य सरकारने दुधाला प्रतिलिटर दहा रुपये अनुदान द्यावे – डाॅ. शिवाजी शेंडगे

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

दुग्धोत्पादक शेतक-यांना दुधाला १९ ते २० रुपये भाव मिळत असल्यामुळे दुग्ध व्यवसाय मोठ्या आर्थिक संकटात आला आहे. त्यामुळे शासनाने दूधाला प्रतिलिटर १० रुपयांचे अनुदान देऊन ते शेतक-यांच्या खात्यात वर्ग करावे, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा सचिव डाॅ. शिवाजी शेंडगे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
मराठवाड्यात बहुसंख्य शेतक-यांचा शेतीला पुरक जोडधंदा म्हणून दूग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. बेभरवशाच्या पावसामुळे शेतजमिनीवर अवलंबून न राहता ठोक उत्पन्न हाती येत असल्याने शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे मोठ्या संख्येने वळले असून याच व्यवसायावर त्यांच्या उदरनिर्वाहाची मदार आहे. यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक करून शेतक-यांनी गायी-म्हशी विकत घेतल्यात. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाच्या संकटामुळे राज्यात दुग्ध व्यवसायाला खिळ बसली आहे.
दूधाचे भाव ३४ रुपयांवरून थेट १९ ते २० रुपये प्रतिलिटरवर आले आहेत. चारा व पशुखाद्याचे दर लक्षात घेता शेतकरी वर्गाला तोटा सहन करावा लागत आहे. दुग्धव्यवसाय अडचणीत आल्यानंतर शेतक-यांना दिलासा देण्यासाठी तत्कालीन दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी अनुदान दिले होते. त्याचप्रमाणे राज्य सरकारनेही शेतक-यांना दिलासा देण्यासाठी दुधाला १० रुपये प्रतिलिटर अनुदान देऊन शेतक-च्या खात्यात जमा करावे, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली. रासपतर्फे राज्यातील तहसीलदारांना अनुदान देण्याबाबत निवेदने देण्यात आली असून आगामी काळात शेतक-यांना अनुदान प्राप्त न झाल्यास पक्षातर्फे मराठवाडाभर आंदोलन उभारणार असल्याची माहिती डॅा. शेंडगे यांनी दिली. यावेळी रासपचे गंगा खेडकर, रफिक पठाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here