Shrirampur : विलगीकरण कक्षातील नागरिकांनी शाळेचे रूप पालटले

0

प्रतिनिधी | संदीप आसने

माळवाडगांव – विलगीकरणकक्षात ठेवलेल्यांना भरपूर मोकळा वेळ मिळत आहे. काही जण सोशल मीडिया समाज माध्यमांवर हा वेळ खर्च करत आहे, तर काही जण गाणी,चित्रपट पाहण्यात वेळ घालवत आहे. तर काही जण त्याला शिक्षा समजत आहे. मात्र, श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथील जानकीबाई वामनराव आदिक येथील शाळेतील विलगीकरण कक्षात ठेवलेल्या सात व्यक्तींनी या वेळेचा सदुपयोग करून शाळेचे रूपच बदलून टाकले आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून शाळा बंद असल्याने खानापूर येथील शाळेत सर्वत्र कचरा आणि धूळ साचली होती. खानापूरचे पोलीस पाटील संजय आदिक, ग्रामसेवक सुधीर उंडे, बाळासाहेब भालेराव यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गणेश भालेराव, महेश भालेराव, सविता भालेराव, अर्जुन मोरे, लक्ष्मीबाई मोरे, कार्तिक मोरे, रवी मोरे या सात जणांनी दोन ते तीन दिवसात शाळा परिसर स्वच्छ करून या ज्ञानमंदिराची चमक वाढवली, तसेच हा उपक्रम त्यांनी पुढे सुरू ठेवला.
दररोज सकाळी आठ वाजल्यापासून ही मंडळी शाळेच्या स्वच्छतेला सुरुवात करतात, सध्या ते शाळेच्या प्रांगणातील झाडांना आळे करुन पाणी देणे, शाळेतील भिंतींची स्वच्छता करणे अशा प्रकारची कामे करत आहे. सध्या उन्हाच्या तीव्र झळा बसत असताना, जी झाडे जळून जाण्याच्या मार्गावर होती, ती आता नियमित पाणी मिळत असल्याने चांगली चालली आहे. गावात आल्यानंतर विलगीकरणकक्षात ठेवले जाणार या विचाराने ज्यांना भीती वाटते त्यांना या सात जणांनी आपल्या कार्यातून चांगलीच चपराक लगावली आहे.
या कुटुंबियांच्या चांगल्या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.यावेळी पोलीस पाटील संजय आदिक,काकासाहेब चौधरी,बाळासाहेब भालेराव,मच्छिंद्र गायकवाड,नवनाथ बर्डे,सादिक शेख यासह आदींनी या कामाची पाहणी केली.
बाळासाहेब भालेराव हे स्वत: उच्चशिक्षित असल्याने त्यांनी पुणे येथून आलेल्या त्यांच्या कुटुंबियांना स्वतःच विलगीकरण कक्षात ठेवण्याचा निर्णय घेऊन याबाबत ग्राम कोरोना समितीला माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here