तिळापूर सरपंचांच्या पुढाकाराने रस्त्यावरील काटेरी झुडपांचे अतिक्रमण काढण्यात आले
राहुरी – तिळापूर ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या जुने गावठाण हनुमान मंदिर ते केशव बाबा मंदिर (मेळ रस्ता) पर्यंतचा रस्ता काटेरी झुडपांच्या अतिक्रमणाच्या विळख्यातून मोकळा झाला आहे. ग्रामपंचायत सरपंच राधिका गरदरे यांच्या पुढाकारातून हे कार्य करण्यात आले. या कामात त्यांचे पती विजय गरदरे यांनी सहकार्य केल्याने अखेर या रस्त्याने मोकळा श्वास घेतला.

मागील काही वर्षांपासून हा रस्ता काटेरी झुडपांच्या अतिक्रमणामुळे बंद होण्याच्या मार्गावर आला होता. ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या शेत शिवार रस्त्यामध्ये व रस्त्याच्या कडेला झालेल्या काटेरी झाडाझुडपांची अतिक्रमण सरपंच व त्यांच्या पतीच्या पुढाकाराने काढण्यात आले. कोरोना महामारीची परिस्थिती हाताळत असताना गावातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने पावले उचलत महत्त्वाचे पिण्याचे पाणी व रस्त्याच्या समस्या सोडवण्याचे काम त्यांनी केले.
या रस्त्याचे काटेरी झाडे झुडपे काढल्यामुळे रस्ता आहे म्हणून दिसू लागला. नाहीतर रस्ताच काट्यात गेला होता. याच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले असेल त्याचे अतिक्रमण लवकरच काढण्यात येऊन रस्ता रुंदीकरण करण्यात येईल, असे विजय गरदरे यांनी सांगितले.
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष अण्णासाहेब जाधव, पोलीस पाटील वाघमारे, स सो मा चेअरमन अण्णासाहेब सरोदे, ग्रामपंचायत कर्मचारी हरिभाऊ आचपळे, मा चेअरमन हिरालाल जाधव, दत्तात्रय चोरमले यांनी परिश्रम घेतले व रस्त्याचा श्वास अखेर मोकळा केला.