corona: शटर बंद, दुकान चालू… श्रीरामपूरकर कोरोनाला फसवताहेत की स्वतःला..?

0

नावापुरती बाजारपेठ बंद ठेऊन कोरोनाला हरविता येईल, अशा भ्रमात श्रीरामपूरकर आहेत. (छाया : रुपेश सिकची) 

विशेष प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

श्रीरामपूर : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी श्रीरामपूरमध्ये दर रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात येतो; मात्र हा केवळ देखावा असून शहरातील मुख्य बाजारपेठेत शटर बंद पण दुकाने चालू अशी स्थिती आहे. वार्ड नंबर दोन आणि शहराच्या उपनगरातील बाजारपेठ मात्र बेधडक खुल्या आहेत. बंदचा दिखाऊपणा करून श्रीरामपूरकर कोरोनाला फसवतात, की स्वतःला असा प्रश्न पडतो.

मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. तेव्हापासून केंद्र आणि राज्य शासनाने बाजारपेठा बंद केल्या. त्याच दरम्यान श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी शहरात दर रविवारी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. गेली दीड महिना शहर बंद असल्याने हा कर्फ्यू कायद्याच्या भीतीने तंतोतंत पाळला गेला; पण जूनच्या पहिल्या आठवड्यापासून बाजारपेठ खुली झाली. जनता कर्फ्यूही नावापुरता उरला. कर्फ्यू पाळायचा की नाही याबाबत मतमतांतरे निर्माण झाली. त्यात राजकारण घुसल्याने जनता कर्फ्यू प्रभावहीन झाला.

आज जून महिन्यातील दुसरा रविवार. जिल्ह्यात आणि विशेषतः शेजारील संगमनेर, राहाता तालुक्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत अपवाद वगळता श्रीरामपूरने कोरोनाला दूर ठेवण्यात बऱ्यापैकी यश मिळवले आहे. त्याचे श्रेय येथील प्रशासनासह सामान्य जनतेलाही द्यावे लागेल. व्यापारी वर्गही आतापर्यंत नियमांचे काटेकोर पालन करताना दिसला. पण बाजारपेठ खुली झाल्यापासून सर्वांनीच नियमांना केराची टोपली दाखवली. शहरात सोशल डिस्टेनसिंग नावापुरती आहे. पोलिसही आता दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे नागरिकांना गांभीर्य नाही. जनता कर्फ्यूचा दिखाऊपणा करून श्रीरामपूरकर काय साध्य करणार? हा प्रश्न अनुत्तरित राहतो.

कोरोना रविवार पाहून येतो का?

कोरोना प्रतिबंधासाठी वैद्यकीय आणि शासकीय पातळीवर वेगवेगळे प्रयत्न सुरु आहेत. त्यात सुमारे अडीच महिने बाजारपेठ बंद राहिल्याने मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. आता बाजारपेठ सुरु झाल्यानंतरही एक दिवस बंद पाळण्याचा अट्टाहास कशासाठी? कोरोना काय रविवार पाहून येतो का? असे प्रश्न सामान्य व्यापारी वर्गातून विचारले जात आहेत.

काय करावे..?

 बंदसारखे आत्मघातकी प्रयोग करण्यापेक्षा शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे प्रत्येकाने काटेकोरपणे पालन करावे. सोशल डिस्टेनसिंग, सॅनिटाइझर, मास्क आणि कामाशिवाय बाहेर न पडणे ही जीवनशैली करावी. व्यापारी वर्गाने आपल्या दुकानात गर्दी न होऊ देता प्रत्येकाची लेखी नोंद ठेऊन व्यवहार करावेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, नागरिकांनी आपल्या भागात आलेल्या बाहेरगावच्या नागरिकांची माहिती लपवू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here