किरकोळ वादातून मध्यरात्री दमदाटी करून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
अहमदनगर – किरकोळ वादात राजकीय संबंधातून पोलिस उप अधीक्षक पदाच्या अधिकाऱ्याने मध्यरात्री घरी येऊन आपली बाजू ऐकून न घेता शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच अपशब्द वापरून मानहानी केल्याची तक्रार एका महिला वकिलाने पोलिस अधीक्षक अहमदनगर यांच्याकडे केली आहे.
वृषाली गोरक्षनाथ तांदळे या महिला वकिलाने पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, वसाहतीमधून गाडी सुसाट चालवण्यावरून गोविंद खुराणा या व्यक्तीशी त्यांचे पती गोरक्षनाथ तांदळे यांचे किरकोळ वाद झाले. गोविंद खुराणा यांचे राजकीय व्यक्ती हरजीतसिंग वाधवा व पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके यांचेशी जवळचे संबंध असल्यामुळे मिटके यांनी स्वतः घटनास्थळी येउन मध्यरात्री फक्त खुराणा यांचीच बाजू ऐकून घेत व आमची कोणतीही बाजू ऐकून न घेता आम्हालाच दमदाटी करून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. खुराणा यांची माफी मागा अन्यथा तुमच्यावर गुन्हे दाखल करू अशी धमकी मिटके यांच्याकडून दिली गेली अशी तक्रार निवेदनात करण्यात आली आहे.
माफी मागण्यास गोरक्षनाथ तांदळे यांनी नकार देताच त्यांना उचलून गाडीत टाकण्याचे आदेश मिटके यांनी त्यांच्यासोबत आलेल्या पोलिसांना दिले. शासनामार्फत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याचीही धमकी त्यांनी दिली. हे सर्व घडत असताना तांदळे यांची मुले पोलीसांना बघून घाबरून रडत होती तरीही कुठलीही दयामाया न दाखवता पोलिसांनी तांदळे यांना खुराणा यांची माफी मागण्यास भाग पाडले.
वास्तविक पाहता किरकोळ वादासाठी संदीप मिटके यांच्यासारखा पोलीस उपअधीक्षक पदावरील अधिकाऱ्याने प्रत्यक्ष घटनास्थळी येण्याची गरज नव्हती. परंतु राजकीय व मैत्रीपूर्ण संबंधातून मिटके यांनी या प्रकरणाची जास्तच गांभीर्याने दखल घेतली. खुराणा यांची एकतर्फी बाजू घेत आमचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता आम्हाला शारीरिक व मानसिक त्रास देऊन व आम्हा दोघा पती पत्नीस अपशब्द वापरून मानहानी केली व खुराणा यांची विनाकारण माफी मागण्यास भाग पाडले असून यासंदर्भात योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
राज्य महिला आयोग, अहमदनगर बार असोसिएशन, जिल्हाधिकारी,पोलिस आयुक्त, पालकमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्री आदींना या निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण त्या दिवशी पेट्रोलिंगवर असल्याने त्याठिकाणी वाद होत असल्याने केवळ वाद मिटवण्यासाठी गेलो होतो, असे सांगितले.