राहाता नगरपालिकेत कोरोनासंदर्भात बैठक
राहाता : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सक्षम यंत्रणेची उभारणी करुन कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करावे लागेल, असे मत उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी राहाता नगरपालिकेत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात उपाययोजनेच्या आढावा बैठकीत बोलताना व्यक्त केले.

राहाता शहरात कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे तातडीने राहाता नगरपालिकेत बैठक घेण्यात आली. प्रांत गोविंद शिंदे, नगराध्यक्षा ममता पिपाडा, तहसिलदार कुंदन हिरे, डॉ.राजेंद्र पिपाडा, मुख्याधिकारी अजित निकत, डॉ.घोगरे, डॉ. भिंगारदिवे, मंडलाधिकारी भालेकर, तलाठी शिरोळे आदी उपस्थित होते.
राहाता शहरात कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाल्यामुळे तातडीने आयोजित केलेल्या बैठकीत प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी उपस्थित सर्व कर्मचा-यांना मार्गदर्शन केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष तयार करणे गरजेचे आहे. कंटेन्मेंट झोन क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त कर्मचा-यांची नेमणूक करुन तेथील परिस्थिती अटोक्यात कशी आणता येईल यासंदर्भात रुपरेषा तयार करण्याचे मुख्याधिका-यांना आदेश दिले. तात्काळ संशयितांचे स्राव घेऊन ते तापासणीसाठी पाठविण्याचे आदेश डॉ.घोगरे यांना दिले.
यावेळी नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनीही कर्मचा-यांना सूचना केल्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की ही मोहिम राबविताना कर्मचा-यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.