बंद कालावधीत जंतूनाशक फवारणी – नगराध्यक्षा संगीता गोरंटयाल
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
जालना – शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघाने शुक्रवारपासून (दि.19) तीन दिवस जालना बंदचे आवाहन केले आहे. या बंदला जालन्याचे आमदार कैलास गोरंटयाल यांनी जाहीर पाठिंबा देत जनतेला देखील सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
जालना व्यापारी महासंघाच्या बैठकीमध्ये जालना शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. हा धोका लक्षात घेऊन सर्वच व्यापारी असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांनी दि.19 ते 21 जून या तीन दिवसांच्या कालावधीत जालना बंदचे आवाहन करत सर्व व्यवहार बंद ठेवून शेती, वैद्यकीय प्रतिष्ठानसह अत्यावश्यक सेवा वगळून जनता कर्फ्यू स्वयंस्फूर्तीने पाळून सर्व व्यवहार कडेकोट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जालना शहर व जिल्ह्यात कोरोनाचे जवळपास 300 पेक्षा अधिक रूग्ण आढळून आले असून यापुढेही रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत असल्याने याचा विपरीत परिणाम आरोग्य विभागवार होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्वोतोपरी प्रयत्न होत असले तरी शहरातील अनेक भागात जनतेकडून प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन व्यापारी महासंघाने शुक्रवार ते रविवार असे तिन दिवस सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्या परिवाराची व जनतेच्या आरोग्याची काळजी घेऊन स्वंयस्फूर्तीने आपाआपली दुकाने संपूर्णपणे बंद ठेवून व्यापारी महासंघास व प्रशासनास मदत करवी. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेशशेठ तवरावाला, शहराध्यक्ष सतीश पंच, कार्याध्यक्ष विनित सहानी, राजेश राऊत, सचिव संजय दाड, सहकोषाध्यक्ष शाम लोया आदी व्यापारी बांधवांनी बंदबाबत केलेल्या आवाहनास आमदार कैलास गोरंटयाल यांनी देखील प्रतिसाद देऊन या बंदला पाठिंबा दिला आहे. जालना शहरातील सर्व व्यापारी, छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन जालना बंद यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे आणि जनतेने देखील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत करावी, अशी अपेक्षा गोरंटयाल यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या तीन दिवसांच्या बंद कालावधीत जालना नगर परिषद प्रशासनातर्फे जालना शहरातील सर्व भागात जंतुनाशक औषधी फवारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा संगीताताई गोरंटयाल यांनी दिली. व्यापारी महासंघाने तीन दिवस व्यवहार बंद ठेवण्याचा घेतलेला निर्णय हा सर्व जनतेच्या हिताचा असल्याने या बंदला जनतेने देखील पाठिंबा द्यावा असे आवाहन नगराध्यक्षा सौ.संगीताताई गोरंटयाल यांनी केले आहे.