प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
‘मुख्यमंत्र्याच्या सतत पाया पडणारा विरोधी पक्ष नेता राज्याने पाहिला आहे. त्यामुळे काँग्रेसला लाचार म्हणाऱ्यांनाच हा शब्द योग्य ठरतो,’ अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर पलटवार केला आहे.
विखेपाटील यांनी थोरात यांचे नाव न घेता सत्तेसाठी लाचार झालेला प्रदेशाध्यक्ष पाहिला नाही, अशा शब्दांत टीका केली होती. याला उत्तर देताना थोरात यांनी हा पलटवार केला आहे. ‘आज आम्हाला लाचार म्हणणारे तेव्हा विरोधीपक्ष नेते होते. त्यावेळी त्यांनी किती लाचारी केली, सतत कसे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या पाया पडत होते, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. ती त्यांची लाचारीच होती. त्यामुळे लाचार हा शब्द त्यांनाच योग्य ठरतो. आमचे सरकार योग्य पद्धतीने काम करीत आहेत. महाविकास आघाडी मजबूत आहे,’ असं थोरात म्हणाले.
काय म्हणाले होते विखे-पाटील?
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, अशी कुठलीही नाराजी नसल्याचं थोरात यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर स्पष्ट केलं होतं. त्यावरून विखे-पाटील यांनी आज थोरातांवर टीका केली होती. ‘सध्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना कोणी विचारत नाही. महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसच्या मंत्र्यांनाही विचारले जात नाही. तरीही काँग्रेस सत्तेसाठी सरकारमध्ये आहे. सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष आपण यापूर्वी कधीच पाहिले नाहीत. त्यांच्यामध्ये थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असेल तर त्यांनी सत्ता सोडून सरकारमधून बाहेर पडावे.
सरकारमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या पक्षाच्या मुखपत्रातून कुरकुरणारी जुनी खाट अशा शब्दांत खिल्ली उडवली तरी काँग्रेस नेतृत्वाला काहीही वाटत नाही. एवढे सर्व होऊनही आम्ही समाधानी आहोत असे जर ते म्हणत असतील तर तो एक मोठा विनोद आहे किंवा मग ते सत्तेसाठी लाचार आहेत, असे म्हणावे लागेल. एवढा अपमान होऊनही काँग्रेस सत्ता सोडेल, अशी यांच्याकडून अपेक्षा करता येणार नाही, असं विखे-पाटील म्हणाले होते.