प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
मुंबईहून येथे आलेले तीन जण कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यानंतर ते कोरोनामुक्तही झाले. तालुक्यातील एकही नागरिक कोरोनाबाधित आढळला नाही. तालुका कोरोनामुक्त राहिला, असे म्हटले, तरी वावगे ठरू नये. त्यामुळे कोरोनाविषयी नागरिकांची भीती ओसरली आहे. येथील जनजीवन सुरळीत झाल्याचे दिसत आहे. मात्र, तरीही बाजारपेठेतील अनावश्यक गर्दी टाळणे आवश्यक आहे.

मुंबईहून वांबोरी येथे आलेला तरुण कोरोनाबाधित आढळून आला. तसेच मुंबईहून टाकळीमियॉं येथे माहेरी येणारी महिला व तिची मुलगी नगर येथे कोरोनाबाधित आढळून आले. मात्र, तरुण व महिला आठ दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झाले. त्यानंतर काल (मंगळवारी) मुलगी कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आली.
कोरोनाबाबत आता भीती ओसरल्याने येथील बाजारपेठ खुली झाली. शहरातील भाजीमंडई बंद असली, तरी भाजीविक्रेत्यांना रस्त्यावर अंतर राखून बसण्यास परवानगी मिळाली. दिवसेंदिवस बाजारपेठेत गर्दी वाढत आहे. नागरिक बिनधास्त वावरताना दिसत आहेत. अनावश्यक गर्दी चिंताजनक आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त राहिलेल्या तालुक्यात वाढत्या गर्दीमुळे कोरोनाबॉम्ब फुटण्याची भीती व्यक्त होत आहे.
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नलिनी विखे म्हणाल्या, की तालुक्यात आजअखेर 140 जणांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी घेतले. हे सर्व जण निगेटिव्ह आढळले. मुंबईहून आलेले तिघेही कोरोनामुक्त झाले असले, तरी नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे.
आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सत्यजित पा. कदम म्हणाले, की राहुरीच्या बाजारपेठेतील गर्दी चिंताजनक आहे. लोकांना कोरोनाचा विसर पडल्यासारखी परिस्थिती आहे. कोरोना महामारी संपलेली नाही. असेच चित्र राहिले, तर भविष्यात कोरोना रुग्ण वाढण्याची भीती आहे.