Agriculture : सोयाबीनची पेरणी वाया जाण्याची शक्यता? पंचनाम्याची मागणी

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री |

मागील अतीपावसामुळे यंदा सोयाबीनचा बीजोत्पादन कार्यक्रम फारसा यशस्वी झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनचे घरगुती बियाणे वापरावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले होते. अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आवाहनाची अंमलबजावणी करत घरगुती तसेच बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झालेले महाबीज, गीन गोल्ड, कृषीधन आदी कंपन्यांचे सोयाबीनचे बियाणे पेरले. मात्र, अनेकांच्या शेतामध्ये सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही.

बियाणे उगवले नसल्याबद्दलच्या तक्रारीत आता सातत्याने वाढ होऊ लागली असून, कृषी विभागाकडे अनेक शेतकऱ्यांच्या उगवण संदर्भातील तक्रारी आल्या आहेत. या तक्रारीनुसार पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाने तालुका कृषी अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणीही सध्या जोर धरत आहेत. पंचनाम्याअभावी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करणे अवघड होणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचे घरगुती बियाणे पेरताना त्याची उगवण क्षमता तपासली नाही. त्याचा परिणाम उगवण शक्तीवर झाला असावा. अथवा ट्रक्टरच्या सहाय्याने घाई करत वाफशावर न येऊ देताच शेतीत पेरणी केल्यामुळे किंवा जोरदार पाऊस झाल्यामुळे सोयाबीन उगवली नसल्याचा अंदाज बांधला जात आहे. दरम्यान सोयाबीन न उगवलेल्या शेतीचे त्वरीत पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत आहे.

शेतकरी बांधवांनो, मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाण्याचा बाबतीत तक्रारी ऐकू येत आहेत की बियाणे कमी प्रमाणात उगवतं आहे, उगवतच नाही, ते जमिनीतच सडत आहे वगैरे वगैरे…मित्रहो दर वर्षी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग एक पत्रक काढून शेतकरी बांधवांना सोयाबीन पेरणीविषयी मार्गदर्शन करत असतो की चांगला पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका व बीजप्रक्रिया करा. चांगला पाऊस म्हणजे जमिनीचे तापमान कमी व्हायला जेवढा पाऊस लागतो तेवढा. एक दोन पावसात जमिनीचे तापमान कमी होत नाही. जमिनीचे तापमान कमी करण्यासाठी तीन ते चार चांगले पाऊस पडावे लागतात.

ह्यावर्षी नेमके उलट चित्र आहे. पाऊस पडलाय पण फार कमी पडलाय. तो मान्सूनचा पाऊस नाही. खरा मान्सून आणखी यायचाय. काही भागात अति पाऊस पडलाय, पण पाणी मुरले नाही, वाहून जास्त गेले, तरी काही शेतकरी बांधवांनी सोयाबीन पेरणीची गडबड केली. कोणी ट्रॅक्टरने, कोणी तिफनी ने पेरून घेतले, जमिनीत बियाणं खोल पडलं. खालून प्रचंड उष्णता व वरून थोडी भिजलेली माती, यात ते बियाणे सडून गेले. त्याच्यातून दाबले की पाणी निघत आहे. कारण फक्त उष्णता. कारण जमीन आणखी पाहिजे त्या प्रमाणात थंड झाली नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी चांगला पाऊस म्हणजे भिजपाणी होईपर्यंत पेरणी करू नये. सोयाबीन पीक लवकर पेरल्यामुळे उत्पादनात फार फरक पडत नाही, सोयाबीन 15 जुलैपर्यंत पेरण्याची शिफारस शासन, कृषिविभाग, कृषीविद्यापीठ व कंपन्या करत असतात. त्यामुळे गडबड करू नका मान्सून पूर्ण सक्रीय होऊ द्या व नंतरच पेरणी करा. धन्यवाद !

  • अंजली उंडे कृषी अधिकारी, श्रीरामपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here