प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
श्रीगोंदा – येळपणे येथील खंडोबा मंदिरातील चोरी प्रकरणातील चोरट्यांना पोलिसांनी गजाआड केल्याचे खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली आहे. याप्रकरणी सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन पोलीस अधिकृत माहिती देणार असल्याचे वृत्त आहे. नगर तालुक्यातील काही आरोपी असून त्यांनी घोड धरणाच्या शिवारात राहणा-या एका नातेवाईकाच्या मदतीने खंडोबा मंदिरात चोरी केल्याची माहिती समजली आहे.
येळपणे येथील खंडोबा मंदिरात शनिवारी (दि.13) रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. मंदिरातील सुमारे एक लाख 70 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, पितळी मुखवटे, लहान-मोठे घोडे, मंगळसूत्र, बदाम त्याच्यासोबत विजेची उपकरणे चोरी केली.
घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी श्वानपथकाच्या मदतीने माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तपासाच्या दृष्टीने सकारात्मक काहीच मिळाले नाही. मात्र, ठसे तज्ञांच्या तपासणीत ठसे मिळाले. दरम्यान, मंदिरात चोरी झाल्याने बेलवंडी पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही चोरी उघड करण्याचा चंग बांधला. त्यातील गावातील काही खंडोबा भक्तांची यात मदत घेतली आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास सुरू केला.
या चोरीत काही आरोपी नगर तालुक्यात असल्याची प्राथमिक माहिती असून घोड धरणाच्या शिवारात राहणाऱ्या एका नातेवाईकाची मदत घेऊन खंडोबा मंदिरात चोरी करीत मुद्देमाल लंपास केला. याबाबत अधिकृत माहिती अहमदनगर पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार यादव हे सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचे वृत्त आहे.