Editorial : बहुमताच्या दिशेने…

0

राष्ट्र सह्याद्री 21 जून

राज्यसभेच्या निवडणुकीचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले. काँग्रेसच्या आमदारांत फूट पाडून भाजपने दोन जास्त जागा पदरात पाडून घेतल्या. काँग्रेसला गुजरातमध्ये एक आणि मध्य प्रदेशात एक जागा गमवाली लागली. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडाने काँग्रेसचे सरकार गेले. त्यांच्या समर्थक २२ आमदारांनी राजीनामे दिले. त्यामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेसची एक जागा हातातून गेली. गुजरातमध्ये काँग्रेसच्या दोन जागा निवडून आल्या असत्या; परंतु आठ आमदारांनी राजीनामे दिल्याने तिथेही काँग्रेसच्या हातातून एक जागा गेली.

राजस्थानमध्येही भाजपने आॅपरेशन लोटस हाती घेतले होते; परंतु तिथे भाजपची डाळ शिजली नाही. काँग्रेसने दोन तर भाजपने एक जागा जिंकली. मणिपूरमध्ये मोठी बंडाळी झाली, तिथे सरकार पडेल, की काय असे वातावरण तयार झाले. या बंडाळीचा परिणाम राज्यसभेच्या जागेवर होईल, असे मांडे विरोधकांनी खाल्ले; परंतु भाजपची व्यूहनीती तेथेही यशस्वी झाली.

या वेळच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे आता राज्यसभेत नवीन चेहरे जास्त येणार आहेत. भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या जागा लक्षात घेतल्या, तर भाजप आणि मित्रपक्षांची राज्यसभेत बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दिसते. यावेळच्या निवडणुकीत प्रथमच ७२ टक्के लोक नव्याने राज्यसभेत प्रवेश करीत आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत गुजरात आणि मध्य प्रदेशमधील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ७२ टक्के नवखे लोक प्रथमच संसदेच्या उच्च सदनात पोहोचू शकले आहेत.

या चेह-यांपैकी मल्लिकार्जुन खरगे, ज्योतिरादित्य शिंदे आणि के.सी. वेणुगोपाल हे नेते आपल्या राजकीय जीवनात प्रथमच राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ६१ जागांच्या निवडणुकीत 43 लोक प्रथमच राज्यसभेवर निवडून आले आहेत. 61 निवृत्त सदस्यांपैकी केवळ 12 खासदार पुन्हा वरिष्ठ सभागृहात परतले आहेत. आयारामांना उमेदवारी देऊन त्यांना सालंकृत करण्याचे काम भाजपने केले. काँग्रेस सोडून गेलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांना राज्यसभेवर घेण्यात आल्याने त्यांचा मंत्रिपदाचा मार्गही मोकळा झाल्याचे मानले जाते. आंध्र प्रदेश विधानसभेचे माजी सभापती के. सुरेश रेड्डी हेही पहिल्यांदा राज्यसभेवर पोहोचले आहेत. काँग्रेस सोडणारे भुवनेश्वर कलिताही भाजपच्या मदतीने राज्यसभेत आले आहेत. राष्ट्रीय जनता दलाच्या प्रेमचंद गुप्ता यांना भाजपत आणून त्यांनाही खासदार करण्यात आले.

तेलंगणा राष्ट्र समितीचे केशव राव, विश्वजित डायमरी आणि परिमल नथवाणी तिस-यांदा काँग्रेसचे दिग्विजय सिंह आणि केटीएस तुळशी, राष्ट्रवादीचे शरद पवार, आरपीआयचे रामदास आठवले, संयुक्त जनता दलाचे हरिवंश आणि रामनाथ ठाकूर सलग दुस-यांदा या वेळी राज्यसभेवर आले आहेत. त्याचबरोबर माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्यासह अनेक चेहरे या निवडणुकीच्या माध्यमातून सभागृहात पोहोचण्यास यशस्वी झाले आहेत. त्यापैकी जीके वासन, दिनेश त्रिवेदी आणि नबम राबिया काही अंतरानंतर तिस-यांदा राज्यसभेवर पोहोचले आहेत. देवेगौडा आणि झामुमोचे शिबू सोरेन यांच्यासह ओंकारसिंग लखावत काही काळानंतर पुन्हा एकदा राज्यसभेवर परत आले आहेत. मध्य प्रदेशात जास्त राजकारण रंगले.

मध्य प्रदेशातील बहुजन समाज पक्षाचे  दोन आणि समाजवादी पक्षाचे एकमेव आमदार आता भाजपच्या जवळ आले आहेत. तीन महिन्यांपूर्वीपर्यंत कमलनाथ सरकारचे समर्थन करणारे हे तीन आमदार आता सत्ताधारी भाजपबरोबर आहेत. राज्यसभा निवडणुकीत पक्षादेशाचे उल्लंघन आणि भाजपला मतदान केल्याबद्दल आमदार राजेश शुक्ला यांना समाजवादी पक्षाने काढून टाकले आहे. असे असले, तरी त्यांची आमदारकी वाचणार आहे. बसपने मात्र अद्याप आपल्या आमदारांबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. दीड वर्ष मध्य प्रदेशात सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या कमलनाथ सरकारच्या काळात सप-बसपने बाहेरून सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता; पण राजकीय गोंधळानंतर भाजपची सत्ता येताच संजीवसिंग कुशवाह, रामबाई परिहार (बसप) आणि राजेश शुक्ला (सप) यांनी भाजप सरकारला पाठिंबा दिला. अशीच परिस्थिती अपक्ष आमदारांची होती.

राज्यसभा निवडणुकीत तिघांनीही पक्षादेशाचे उल्लंघन करून उघडपणे भाजपाला पाठिंबा दर्शविला. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीस ते उपस्थित होते. त्यामुळे सपने शुक्ला यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविला. पक्षाने कोणतीही कारवाई केली, तरी या आमदारांचे कोणतेही नुकसान होणार नाही. त्याचे कारण शंभर टक्के आमदारांनी पक्षादेश मोडल्याने त्यांच्यावरील कारवाईला काहीही अर्थ राहत नाही. आमदारांचे नुकसान होणार नाही, म्हणून त्यांनी त्यांच्या स्तरावर सरकारबरोबर जाण्याचे ठरविले. बसपचे विधिमंडळ पक्षाचे नेते संजीव सिंह यांनी पक्षश्रेष्ठींकडून आम्हाला  कोणताही आदेश नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे बसपच्या दोघांनीही आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी हा निर्णय घेतला. मध्य प्रदेशचे बसप प्रभारी अतरसिंग राव यांनी मात्र पोटनिवडणुकीच्या सर्व 24 जागांवर बसप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.  सपचे प्रदेश प्रभारी जगदेव यादव यांनीही आमदारांच्या निर्णयाशी असमहती दाखविली. त्यांचे उमेदवारही पोटनिवडणुकीत स्वतंत्रपणे उतरणार आहेत.

गुजरातमधील वादामुळे सुमारे चार तास उशिरा झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या निकालात तीन जागा भाजपच्या खात्यात तर काँग्रेसच्या खात्यात एक जागा गेली. शक्तीसिंह गोहिल हे काँग्रेसच्या जागेवर निवडून आले आहेत. तत्पूर्वी, भाजपच्या दोन आमदारांची मते अवैध घोषित केल्याबद्दल काँग्रेसच्या आमदारांनी केलेल्या गदारोळामुळे मतमोजणीस उशीर झाला होता. अक्षय भारद्वाज, रमिलाबेन बारा आणि नरहरी अमीन अशी भाजपकडून राज्यसभेवर निवड झालेल्यांची नावे आहेत. काँग्रेसने नामांकन केलेले आणखी एक उमेदवार भरतसिंह सोलंकी यांना निवडणूक जिंकता आली नाही.

शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंह सोलंकी आणि केसरी सिंग यांच्या मतदानास काँग्रेसने आक्षेप घेतला होता. हा आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळला. आक्षेपामुळे मतमोजणी चार तास उशिरा झाली. बीटीपी मतदानापासून दूर राहिले तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमेव आमदाराने भाजपला मतदान केले. कायदामंत्री चुडासामा यांची आमदारकी उच्च न्यायालयाने रद्द रकेली आहे; परंतु त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे त्यांना मतदान करू देण्यास काँग्रेसने आक्षेप घेतला.  केसरीसिंग यांना प्रॉक्सी मत देण्यालाही काँग्रेसने आक्षेप घेतला होता.

यापूर्वी दोन्ही पक्षांमध्ये एका मतासाठी रस्सीखेच होती; परंतु भाजपला व्यूहनीतीमध्ये यश आले. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपला आठ जागा, काँग्रेसला चार जागा मिळाल्या, तर वायएसआर  काँग्रेसलाही चार जागा मिळाल्या. मागच्या वेळी भाजपकडे नऊ जागा होत्या. याचा अर्थ भाजपला एका जागेचे नुकसान झाले, तर काँग्रेसलाही दोन जागांवर नुकसान सहन करावे लागले. प्रादेशिक पक्षांनी या जागा मिळवल्या. राज्यसभेतील एक जागा भाजपने गमावली असली, तरी या पक्षाच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे कोणतेही नुकसान झाले नाही.

राज्यसभेच्या या 19 जागांपैकी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने दहा जागा जिंकल्या. एमडीए-एमएनएफला प्रत्येकी एक जागा मिळाली. संयुक्त पुरोगामी आघाडीला मागच्या वेळी सात जागा मिळाल्या होत्या. त्यातील दोन जागा या आघाडीने गमविल्या. काँग्रेसकडे सहा जागा आणि राष्ट्रीय जनता दलाला एक जागा मिळाली होती. या वेळी काँग्रेसने चार जागा जिंकल्या असून झारखंड मुक्ती मोर्चाने एक जिंकली आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीला पाच जागा मिळाल्या आहेत. मेघालयमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीचे नेते आणि मेघालय लोकशाही आघाडीचे संयुक्त उमेदवार डॉ. खारलुखी विजयी झाले.

मणिपूरमध्ये भाजप अल्पमतात आहे; परंतु या पक्षाच्या मित्रपक्षाचे लेसेम्बा सनाजोबा विजयी झाले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीच्या दोन दिवस आधी बुधवारी मणिपूरमध्ये भाजपचे तीन आमदार काँग्रेसमध्ये दाखल झाले, तेव्हा राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला होता. त्यानंतर राज्यातील सरकार अल्पसंख्याकात आले आहे. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एका आमदाराने तर पीपीई कीटस् घालून मतदान केले. एक कोरोनाग्रस्त आमदारही मतदानाला पोचला होता. इतकी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here