प्रतिनिधि | ज्ञानेश सिन्नरकर | हंडीनिमगाव | राष्ट्र सह्याद्री
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 मार्चला सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आणि सर्वच दुकाने(अत्यावश्यक सेवा वगळता ) सक्तीने बंद करण्यात आली. त्यामधे दारु, सिगारेट, मावा, गुटखा सेवन करणाऱ्यांचे पान टपरी, तसेच बियर बार बंद झाल्यामुळे अतोनात हाल झाले. 200/-रु. ना मिळणारी दारूची बाटली तळीरामानी 600/-रु .ला विकत घेतली. तर 20 रुपयाला मिळणारा मावा शौकीनांनी 50 रुपयांना विकत घेतला.
रग्गड पैसे कमवण्याची जणू काही चढाओढच सुरु झाली. त्यातच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी छापेमारी करून मावा बनवायला लागणारे साहित्य आणि मशीन जप्त करून संबंधीत आरोपींविरुध्द गुन्हेही दाखल केले. तरी सुद्धा दारु आणि मावा विक्री पूर्णपणे बंद झाली नाही. छुप्या मार्गाने आणि चढ्या दराने त्यांची विक्री सुरूच राहिली. अन्न आणि औषध प्रशासनाने या संपूर्ण लॉकडाऊनमध्ये आपले अस्तित्व आहे की नाही याची शंका सर्वसामान्यांच्या मनात निर्माण केली. कुठलीच ठळक अशी कारवाई करताना त्याचे अधिकारी आणि कर्मचारी आढळले नाहीत.
20 जुलै 2018 ला सरकारने मावा ,तंबाखू ,गुटखा तत्सम पदार्थांवर बंदी आणल्यानंतर राजरोस पणे त्यांची खुलेआम विक्री चालु राहते. तेवढ्या पुरती तेवढी कारवाई होते पण लोकांच्या जीवाशी किती दिवस खेळायचे असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. तरी यामधे अन्न औषध प्रशासन, तहसीलदार साहेब आणि पोलिस प्रशासन लक्ष घालून कारवाई करणार का हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.