दोन्ही ट्रक ताब्यात; मध्यप्रदेश येथील 5 सराईत आरोपींना अटक
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

श्रीगोंदा – पुणे जिल्ह्यातील यवत येथून आज (दि.२४) काही आरोपींनी आयटीसी कंपनीच्या सिगरेटचा ५ कोटींचा मुद्देमाल असणारे दोन ट्रक पळवून नगर पुणे महामार्गावर नगरच्या दिशेने घेऊन जात असताना शिरूर नजिक श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पो.नि. राजेंद्र सानप व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी गव्हाणेवाडी चेक नाक्यावर मोठ्या शिताफीने पकडले.
या बाबत सविस्तर असे की पुणे जिल्ह्यातील यवत येथून दोन ट्रक काही जणांनी हायजॅक करून ते नगर पुणे महामार्गावर नगरच्या दिशेने पळून जात असल्याची माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून गव्हाणेवाडी चेक नाक्यावर बंदोबस्तावर असणारे श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे सहायक पो निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली. त्यांनी आपल्या सहकारी पोलिसांच्या मदतीने ट्रकला रोखण्यासाठी याठिकाणी ट्रॅफिक जॅम करून ट्रकला अडथळा निर्माण केल्याने चेकनाक्यावर एक ट्रक पकडण्यात यश मिळाले. परंतु दुसऱ्या ट्रकने मात्र रस्त्यावर आडवे लावलेले बैरिकेट तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी स.पो.नि. सानप व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या पथकाने काही अंतरावर पाठलाग करून हा ट्रक पकडला.
पोलिसांनी हे ट्रक पळून नेणारे मध्यप्रदेश मधील पाच सराईत आरोपी ताब्यात घेऊन हे आरोपी व दोन ट्रकसह ५ कोटींचा पकडलेला मुद्देमाल पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिला. सदर कारवाई स. पो. नि. राजेंंद्र सानप, पोलीस कर्मचारी गाढवे नेमणूक महामार्ग ट्राफिक,कोळपे बेलवंडी पो ठाणे, दांगट , वाकडे , जाधव, पवार नेमणूक मुख्यालय ,होमगार्ड चोरमले, शिंदे यांनी केलेली आहे.