राष्ट्र सह्याद्री 26 जून
कोणतेही औषध वैज्ञानिक कसोटीवर उतरावे लागते. औषध प्रशासन विभागाची परवानगी घेऊनच कोणतेही औषध तयार करावे लागते. हा साधा नियम आहे; परंतु काहींना मात्र आपल्याला कोणतेही नियम लागू नाहीत, असा समज असतो. बाबा रामदेव हे त्यातलेच एक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी जवळीक असल्याने आपण काहीही करू शकतो, असा त्यांचा समज. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना नागपूरमधील जमीन पतंजली समूहाला काडीमोल भावाने दिली होती. नियमबाह्य असे कृत्य करण्यास विरोध करणा-या एका अधिका-याची कशी उचलबांगडी झाली होती, हे सर्वज्ञात आहे.

पतंजली समूहाच्या उत्पादनांच्या दर्जांबाबत आणि त्यांच्या जाहिरातील दाव्यांबाबत तीन वर्षांपूर्वी न्यायालयानेच कानटोचणी केली होती. पतंजलीच्या तुपात बुरशी आढळली होती. आपले उत्पादन चांगले आहे, हे सांगण्याचा रामदेवबाबांना अधिकार आहे; परंतु इतरांची उत्पादने चांगली नाहीत, असे म्हणण्याचा मात्र त्यांना अधिकार नाही. न्यायालयाने त्यावरूनही त्यांची कानउघाडणी केली होती. लोकशाहीत सर्वांना सारखाच नियम असतो; परंतु काहींना ते नियमांपेक्षा मोठे असतात, किंबहुना आपण म्हणू ते नियम अशी त्यांची धारणा असते.
आताही पतंजली उद्योग समूहाने कोरोनावर काढलेल्या कोरोनिल या औषधामुळे जे वास्तव बाहेर आले, त्यातून पतंजलीची पत नक्कीच कमी झाली असेल. पतंजली उद्योग समूहाची उलाढाल दहा हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. लोकांची जाहिरातीच्या माध्यमातून दिशाभूल करूनच एवढे मोठे साम्राज्य उभे राहिले. लोकांना योगाचे धडे देताना त्या माध्यमातून आपली उत्पादने त्यांच्यापर्यंत पोचवण्याचे कसब त्यांच्या अंगी नक्कीच आहे. त्यामुळे तर एवढे मोठे आर्थिक साम्राज्य उभे करता आले. अन्य उत्पादने वेगळी आणि औषधांचे वेगळे. आयुर्वेदिक उत्पादनांचा लोकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता नसते; परंतु दिशाभूल करून एखादे औषध विकले, तर लोक अन्य उपचार थांबवून आजारवाढीला आणि पर्यायाने मृत्यूला निमंत्रण देण्याची भीती आहे. रोगप्रतिकारक क्षमता, ताप आणि खोकल्यासाठी औषध बनवण्याचा परवाना घेऊन कोरोनिलची निर्मिती केल्याचे उत्तराखंड आयुर्वेद विभागाच्या अधिका-यांनीच सांगितल्याने पतंजलीचे पितळ आता उघडे पडले आहे. त्यामुळे कोरोनावर आम्ही औषध शोधले आहे, या रामदेव बाबांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या औषधाबाबत जयपूर एम्स सर्व तपासणी करत आहे. योगी रामदेव यांच्या औषधांच्या विक्रीला महाराष्ट्रात परवानगी नाही, असे आदेश दिले आहेत. राजस्थान सरकारनेही हाच मार्ग अनुसरला आहे.
कोरोनाचे थैमान रोखण्यासाठी रामदेव बाबा यांनी कोरोनिल, श्वासारी ही आयुर्वेदिक औषधे शोधून काढल्याचे जाहीर केले. या दोन्ही गोळ्या असून यामुळे कोरोनाचे रुग्ण सात दिवसांत बरे होतील, असा दावा रामदेव बाबा यांनी केला. एका ठिकाणी तीन दिवसांत तर दुसरीकडे सात दिवसांत कोरोनिलमुळे कोरोना बरा होतो, असा दावा त्यांनी केला. त्यातील नेमका खरा कोणता, हे त्यांनाही सांगता आले नाही. रामदेव बाबा आणि त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांनी एक आठवड्यांपूर्वी आम्ही कोरोनावर औषध शोधून काढले असल्याचा दावा केला होता. लवकरच या औषधांच्या क्लिनिकल ट्रायलसह आम्ही जनतेपुढे येऊ असे त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.
एका आठवड्यातच क्लिनिकल ट्रायल कशा झाल्या, त्या कोणा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेतल्या, त्याचे निष्कर्ष नेमके काय आहेत, याची माहिती आयुष मंत्रालयाला द्यायला हवी होती. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची मान्यता घ्यायला हवी होती. हे कोणतेही सोपस्कार पूर्ण न करताच पतंजलीने औषधे बाजारात आणली. त्यामुळे आयुष मंत्रालयाने त्याची गंभीररित्या दखल घेतली. या औषधांबद्दल आपल्यापर्यंत कोणतीही माहिती पोहोचली नसल्याचे आयुष मंत्रालयाने म्हटले आहे. अशाप्रकारची औषधे शोधल्याचा दावा करण्याची जाहिरात करणे ‘हे ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज’1954 या कायद्याचा भंग आहे. कोरोनाच्या उद्रेकानंतर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमांचाही यातून भंग करण्यात आला आहे.
औषधांच्या निर्मितीचा दावा करणाऱ्या कंपनीला याबद्दल सूचित करण्यात आल्याचेही आयुष मंत्रालयाने स्पष्ट केले. तसेच, संबंधित औषधांचे संशोधन कार्य तपासण्याबद्दल कंपनीला नोटीसही बजावण्यात आली आहे. पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीकडून या औषधांची संपूर्ण माहिती, त्याबद्दलचे संशोधन, किती रुग्णांवर क्लिनिकल ट्रायल घेण्यात आली, त्याची संपूर्ण माहिती, कोणत्या रुग्णालयात हे उपचार करण्यात आले यासंबंधीची सगळी माहिती आयुष मंत्रायाने मागविली आहे. उत्तराखंडमध्ये या कंपनीची नोंद झाली असल्याने त्यांनी कोरोनावर आयुर्वेदिक औषध शोधण्यासाठी त्यांना कोणता परवाना दिला आहे, त्याची प्रतही मंत्रालयाने मागवून घेतली आहे. आयुष मंत्रालयाच्या या भूमिकेवर पतंजलीची बाजू मांडणारे ट्वीट आचार्य बालकृष्ण यांनी केले होते. ‘हे सरकार आयुर्वेदाला प्रोत्साहन देणारे आहे. जो काही कम्युनिकेशन गॅप होता, तो दूर झाला आहे. कंट्रोल क्लिनिकल ट्रायलचे जे काही निष्कर्ष आहेत, ते शंभर टक्के पूर्ण केले आहेत. त्यासंबंधीची सर्व माहिती आम्ही आयुष मंत्रालयाला दिली आहे,’ असे ट्वीट आचार्य बालकृष्ण यांनी केले होते.
हा सर्व घटनाक्रम लक्षात घेता देशातील ब-याच राज्यांनी या आैषधावर बंदी घातली. त्याविरोधात भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला असला, तरी आयुष मंत्रालय केंद्र सरकारचे आहे आणि जिथे कोरोनिलची निर्मिती होते, त्या उत्तराखंड राज्यात भाजपची सत्ता आहे, हे आंदोलन करणा-यांच्या लक्षात यायला हवे. सध्या कोरोनामुळे सामान्यांत दहशत आहे. त्यांना गुणकारी औषध मिळत असेल, तर त्याचे स्वागत करायला हवे; परंतु जगात अनेक शास्त्रज्ञ त्यावर वैज्ञानिक प्रयोग करीत असताना त्यांना जे यश आले नाही, ते अवघ्या काही आठवड्यात रामदेवबाबांना कसे साध्य झाले, हा वादाचा विषय आहे. लोकांच्या अज्ञानाचा आणि बाबांवरील विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या माथी औषधे मारणे हा मोठा अपराध आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही परिस्थिती लक्षात घेऊन अंधपणे भूमिका घेणे टाळायला हवे.
रामदेव बाबा म्हणतात, “कोरोनावर आम्ही औषधे शोधून काढली असून ही औषधे शंभर टक्के यशस्वी झाल्याचे निष्पन्न झालं आहे. आम्ही यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे गिलॉय म्हणजेच गुळवेल, श्वासारी, अश्वगंधा यांचा मुख्य समावेश असलेली औषधे आणणार आहोत. या घटकांसह कोरोनिल आणि श्वासारी या औषधांची निर्मिती पतंजली आयुर्वेदकडून केली आहे. यासाठी आमच्या क्लिनिकल कंट्रोल ट्रायलमध्ये शंभर रुग्ण सहभागी झाले होते. या ट्रायलसाठी ‘क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडिया’कडून आम्ही परवानगी मिळवली होती. या ट्रायलमधले 69 टक्के रुग्ण पहिल्या तीन दिवसांत आणि शंभर टक्के रुग्ण सात दिवसांत बरे झाले.
“भारतात आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करायची असेल तर त्यासाठी दिल्लीतल्या आयुष मंत्रालयाकडून मिळणारा परवाना आवश्यक असतो. हा परवाना मिळाला असेल, तरच आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करता येते. परवाना मिळवून एखाद्या संसर्गजन्य रोगावर नव्याने आयुर्वेदिक औषध तयार करायचे असेल तर ते तयार करून ते वापरात आणण्यामागेदेखील एक प्रक्रिया आहे. मुळात आपल्याकडे एखादे आयुर्वेदिक औषध कोणी नव्याने बनवले असेल, तर ते त्याच्या मेथाॅडाॅलॉजीसह अन्न व औषध प्रशासन विभागाला सादर करावे लागते. ते या औषधाला मंजुरी देतात. कोरोनावर अशी मंजुरी मिळालेले असे कोणतेही आयुर्वेदिक औषध अजून तरी पुढे आलेले नाही. तसेच, गुळवेल आणि अश्वगंधाच्या मिश्रणाने कोरोना बरा होतो हे मान्य करायलाच गेल्या तीस वर्षांपासून शुद्ध आयुर्वेदिक उपचार करणारे डाॅ. राजीव कानिटकर यांच्यासारखे तज्ज्ञ तयार नाहीत.
गुळवेल आणि अश्वगंधा यांनी माणसाची प्रतिकारशक्ती वाढू शकते; मात्र त्याने कोरोना बरा होतो हे सांगायला पुरावे आणि शास्त्रीय अभ्यास सादर करावा लागेल. जर औषध निर्माण केल्याचा दावा केला, तर त्यांनी किती रुग्णांवर उपचार केले? त्या रुग्णांमध्ये कोणती लक्षणे होती? प्रायोगिक उपचार करताना प्लासिबोसारख्या प्रयोगपद्धतीचा वापर केला का? यांसारख्या असंख्य तांत्रिक प्रश्नांची उत्तरे त्यांना द्यावी लागतील. तसेच, कोरोनाची लक्षणे निरनिराळी असल्याची बाब आता समोर आली आहे, असे डाॅ. कानिटकर निदर्शनास आणून कोरोनिलच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह लावतात.
मुंबईतील डॉ. देवीप्रसाद राव गेली 20 वर्षे आयुर्वेदतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनीही कोरोनिलच्या कोरोनावरील उपचाराबाबात शंका उपस्थित केली आहे. गुळवेल, अश्वगंधा ही प्रतिकारशक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधे आहेत हे मान्य केले, तरी त्यांच्या मिश्रणातून कोरोना विषाणूला मारक ठरणारे औषध मिळेल याबद्दल तज्ज्ञ साशंक आहेत. ही पार्श्वभूमी लक्षात घेता केंद्रीय आयुष मंत्रालयाने या औषधाची जाहिरात थांबवण्याचे जे आदेश दिले आहेत, ते योग्य आहेत.