++भास्कर खंडागळे,बेलापूर+++ [९८९०८४५५५१ ]
आज २६ जून, छ.राजर्षी शाहू महाराजांची जयंती. विसाव्या शतकाच्या प्रारंभी देशात सामाजिक चळवळ झाली, तिच्या केन्द्रस्थानी छ.शाहू महाराज हे होते. सामाजिक चळवळ म्हणजे काय असते. हे शाहू महाराजांनी कृतीतून दाखवून दिले. त्यासाठी त्यांनी जे योगदान दिले, त्याचा परामर्श घेतल्यास शाहू महाराजांचे योगदान अधोरेखित होते.
देशात बुध्द, महावीर काळापासून वैदिक विरुद्ध श्रमण संस्कृतीचा संघर्ष सुरु आहे. संत काळात त्याला वारकरी सांप्रदायिक चळवळीचे स्वरुप आले. व्दैत व अव्दैत हा या संघर्षाचा केन्द्रबिंदू होता. संत चळवळीने मोठे यश संपादन केले आणि वारकरी संप्रदाय अस्तित्वात आला.
एकोणिसवे शतक हे पूर्णतः सामाजिक चळवळींचे ठरले. यात महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास म. ज्योतिराव फुले व साविञीबाई फुले हे नायक ठरतात. या दोघांनी मिळून सामाजिक शोषण व्यवस्थेविरुद्ध जो लढा दिला. त्याला तोड नाही. फुले दाम्पत्याने तत्कालिन धर्मपंडितांना सळो की पळो करुन सोडले. बहुजनांची अस्मिता जागविण्याचे मोठे काम या संघर्षातून घडले.
विसाव्या शतकाच्या प्रारंभी छ. शाहू महाराज हे या चळवळीचे सर्वेसर्वा बनली. शाहू महाराज हे दूरदर्शी होते. त्यांना त्यांचा राज्याभिषेक करताना तुम्ही शूद्रच आहात,अशी बोचणी धर्मपंडीतांनी दिली होती. याची मोठी सल शाहू महाराजांना होती. याविरुद्ध त्यांनी चळवळ उभारली. धार्मिक व सामाजिक शोषण व्यवस्थेचे वाभाडे काढले.अशातच डॉ. बासाहेब आंबेडकर नामक रत्न महाराजांना गवसले. या रत्नाला रत्नपारखी शाहू राजांनी सामाजिक पैलू पाडले.
देशातील बहुधार्मिक व बहुरंगी समाजव्यवस्थेच्या वास्तवाला सामोरे जायचे, तर सेक्युलर चळवळ उभारणे अपरिहार्य आहे. सेक्युलर हा शब्द शाहू महाराजांच्या चळवळीतूनच जन्माला आला. भारतीय समाज हा जातिव्यवस्थेवर उभा आहे. नवी व्यवस्था आणायची तर वेदोक्त म्हणजे धार्मिक व्यवस्थेला धक्का देणे आवश्यक होते. म.फुले,विठ्ठल रामजी शिन्दे,राजारामशास्ञी भागवत,डॉ. आंबेडकर यांचे साहित्य व चळवळ अभ्यासली तर वेदोक्त विरुध्द सेक्युलर असा संघर्ष यातून दिसेल. याला वेदोक्त गट ब्राम्हण विरुध्द ब्राम्हणेतर चळवळ म्हणतात.खरे तर ब्राम्हणेतर शब्दाचे जनक राजारामाशास्ञी भागवत हे मानले जातात.
छ.शाहू महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या चळवळीतील दोन विशेष घटना सर्वात महत्वाच्या आहेत. पहिली समाज परिवर्तन चळवळीचे रणशिंग फुंकणारी माणगाव परिषद. तर दुसरी शाहू राजांचे धारवाड वास्तव्य. ह्या दोन घटनांनी सामाजिक चळवळीला मंतरुन टाकले.
शाहू महाराजांचे धारवाड ह्या तत्कालिन कर्नाटकात शिक्षणासाठी वास्तव्य होते.सन १९२० मध्ये धारवाडला ‘कर्नाटक ब्राम्हणेतर परिषद’संपन्न झाली.यास शाहू महाराज उपस्थित होते.यावेळी त्यांची भव्य मिरवणूकही निघाली.हा एका अर्थाने धर्मावर व जातीवर आधारित समाज व्यस्थेविरुध्दचा असंतोषाचा जलसा होता.
मार्च १९२० मध्ये कोल्हापूर जवळील माणगाव येथील अस्पृश्य परिषद तर ऐतिहासिक मानली जाते.शाहू महाराज हे या परिषदेची प्रेरणा होते.या परिषदेच्या निमित्ताने महाराजांनी बहिष्कृतांचे संघटन केले.बॕ.तल्यारखान, गंगाराम कांबळे दत्त्ताजी पवार,डॉ.रमाकांत कांबळे असे नेते हजर होते. माणगावचे आप्पासाहेब पाटील हे या परिषदेचे स्वागताध्यक्ष होते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परिषदेचे अध्यक्ष होते!
या परिषदेत अभ्सयासपूर्ण भाषणे व चर्चा झाली.डॉ.आंबेडकर नामक सामाजिक वादळाचा आणि उत्तुंग नेतृत्वाचा जन्म झाला.या परिषदेत डॉ. आंबेडकरांचा शाहू महाराजांनी यथोचित सत्कार केला.त्यावेळी महाराज म्हणाले की एकदिवस डॉ. बाबासाहेब देशाचे नेतृत्व करतील.डॉ.बाबासाहेब यांनी आपल्या कतृत्वाने छ.शाहू महाराजांचे बोल खरे केले.यापेक्षा थोर श्रध्दांजली छ.शाहूंना दुसरी काय असू शकते.शाहू महाराज हे लोकोत्तर राजे होतेच पण सामाजिक परिवर्तनाचे मानबिंदू आहे.त्यामुळेच देशातील सामाजिक चळवळ फुले,शाहू,आंबेडकर या ञिमूर्तीच्या नावे चालते आणि युगानेयुगे चालत राहिल.