Ahmednagar : इंदोरीकर महाराजांवर संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल; पुढील सुनावणी तीन जुलैला…

0

प्रतिनिधी | विकास वाव्हळ | राष्ट्र सह्याद्री

संगमनेर – प्रसिद्ध समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी कीर्तनातून प्रसूतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केल्याने त्यांच्या विरुद्ध संगमनेर न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणावर पुढील सुनावणी आता 3 जुलैला  होणार आहे.

राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाच्या अतिरीक्त संचालक डॉ.अर्चना पाटील यांच्या आदेशान्वये संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.भास्कर भंवर यांनी इंदुरीकर महाराजांच्या विरोधात संगमनेरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांच्या न्यायालयात वैद्यकीय कायद्याच्या कलमा नुसार गुन्हा दाखल केला.

इंदोरीकर महाराज यांनी गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केला आहे. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली होती. समितीने सर्व पुरावे पीसीपीएनडीटी सल्लागार समितीकडे सादर केले होते. जिल्हा शल्य चिकित्सकांना देखील हे पुरावे दिले होते. मात्र या प्रकरणी कारवाई होत नव्हती. अखेर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना कायदेशिर नोटीस बजावली होती त्यामध्ये इंदोरीकर महाराज यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक यांना सह आरोपी करण्यात येईल,असा इशारा या नोटीस व्दारे अ‍ॅड.गवांदे यांनी दिला होता.

नगरच्या जिल्हा शल्य चिकित्सकांकडे अ‍ॅड.गवांदे यांनी 17 फेब्रुवारीला पहिली तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत निवृत्ती महाराज इंदुरीकर (देशमुख) यांच्या प्रत्येक कीर्तनाचा व्हिडिओ यु ट्युब चॅनेलवर प्रसिद्ध केला जातो. नगर जिल्ह्यात झालेल्या त्यांच्या विविध कीर्तनाचे व्हिडिओ देखील यु ट्युबवर अपलोड करण्यात आले आहेत. त्यात त्यांनी पुत्र प्राप्तीचा संदेश दिला असून त्यात त्यांनी ‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि अशुभ वेळेला झाला तर औलाद रांगडी, बेवडी व खानदान मातीत मिळवणारी होते’असं विधान केल्याचे म्हटले आहे. त्यासोबतच पुढे त्यांनी ‘टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब’ अशा पद्धतीचे असभ्य, बेजबाबदार, कायदा आणि संविधानाचे उल्लंघन करणारे वक्तव्य केल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, ही तक्रार राज्य आरोग्य विभागाकडे देखील करण्यात आली होती. त्यानंतर पीसीपीएनडीटी समितीची याप्रकरणी बैठक झाली. या बैठकीत आलेल्या तक्रारी, इंदोरीकर महाराज यांचे किर्तन व्हिडीओ, वृत्तपत्रांची कात्रणे यांचा विचार करण्यात आला. त्यानंतर पीसीपीएनडीटी समितीने इंदोरीकर महाराज यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यास हिरवा कंदील दिला. त्यानुसार संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.भास्कर भवर यांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून त्यासोबत पुराव्याचे कागदपत्रे संगमनेरच्या प्रथम वर्ग न्यायालयात दाखल केले आहे. त्यावर आज सुनावणी होऊन आता याप्रकरणी पुढील सुनावणी 3 जुलैला होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here