प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
बदनापूर तालुक्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याने या गावांना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश तहसिलदार यांना यावेळी देण्यात आले.

यावेळी आमदार नारायण कुचे, माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, तहसिलदार श्रीमती छाया पवार यांच्यासह तालुका कृषि अधिकारी, मंडळ अधिकारी आदींची उपस्थिती होती.
बदनापूर तालुक्यातील देवगाव, कुसळी, वाकुळणी,बाजार वाहेगाव, रोशनगाव, कस्तुरवाडी या गावांना जिल्हाधिकारी बिनवडे यांनी प्रत्यक्ष भेट देत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकाबरोबरच ईतर नुकसानीची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांकडून घेऊन शेतकऱ्यांशी संवादही साधला.
यावेळी जिल्हाधिकारी बिनवडे म्हणाले, बदनापूर तालुक्यातील काही गावांमध्ये मध्यरात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक रोशनगाव सर्कलमध्ये 207 मि.मी. पावसाची नोंद झाली असून पावसाचे पाणी शेतीमध्ये साचल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी पुलांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश तहसिलदारांना देण्यात आले असून अहवाल प्राप्त होताच नुकसान भरपाईसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार, असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.