प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
जालना – जिल्ह्यातील अंबड व बदनापूर तालुक्यातील पाच महसूल मंडळात गुरूवारी (ता.२५) पहाटे अतिवृष्टी झाली असून बदनापूर तालुक्यातील रोषणगाव परिसरात तर ढगफुटीमुळे शेतजमीन व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गुरूवारी (ता.२५) भल्या पहाटे बदनापूर तालुक्यातील रोषणगाव परिसरात ढगफुटी झाली. तीन तास झालेल्या या ढगफुटीमुळे शेतजमीन व पिकांचे नुकसान झाले आहे. रोषणगावात पंचवीस घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. खरीपाचे उगवलेले पीक या ढगफुटीमुळे वाहून गेले आहे.
या परिसरात असलेल्या दिंडी मार्गावरील वळण रस्ता व त्यावरील पूल वाहून गेला आहे. शेतजमिनीला शेततळ्याचे रूप आले आहे. रोषणगाव परिसरात ढगफुटीमुळे जवळपास सातशे हेक्टर शेतजमीन बाधीत झाली आहे. या भागात गेल्या पन्नास वर्षांत पहिल्यांदाच ढगफुटी झाली असल्याचे काही वृद्ध शेतकरी सांगतात. ढगफुटीमुळे विजेचे खांब खाली पडले आहेत हे विशेष. अंबड तालुक्यातील जामखेड, रोहिलागड, धनगर, पिंपरी, सुखापुरी या महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या परिसरातही शेतजमीन व पिकांचे नुकसान झाले आहे.