Human Intrest: कावळ्याचं घरटं मोडणं पडलं महागात!

0

स्वसंरक्षणासाठी ‘त्या’ने बांधला स्वतःच्या मानेभोवती सुरा..!

शेकडो शिर्डीकर रोजच पाहताहेत कावळा आणि माणसाचा खेळ…

प्रवीण ताटू । राष्ट्र सह्याद्री

शिर्डी : मुलांवर आणि घरावर केवळ माणसाचच प्रेम असतं असं नाही; प्राणी-पक्षीही आपल्या मुलांवर आणि घरावर अतोनात प्रेम करतात, हे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झालं आहे. याचाच अनुभव सध्या शिर्डीकर घेत आहेत.

गच्चीवरील साफसफाई करताना पाण्याच्या टाकीजवळ असलेले कावळ्याचे घरटे पिल्लासह एकाने फेकून दिले. घरटे मोडताना त्याला कावळ्याने पाहिले. यानंतर तो व्यक्ती घराच्या बाहेर पडताच कावळा त्या व्यक्तीवर हल्ला चढवू लागला. हे सदगृहस्थ घराबाहेर आले की, तो कावळा येवून त्यास चोचा मारतो. असे दिवसातून अनेक वेळा घडल्यानंतर मोडलेल घरटे व पिल्ले गमावल्याचा राग कावळ्याच्या मनात असावा, एकदोन दिवसात कावळा विसरून जाईल, असे त्यांना वाटले.

मात्र त्यानंतरही कावळ्याचे हल्ले रोजच होवू लागल्याने स्वसंरक्षणासाठी संबंधित व्यक्ती डोक्यावर कापडासह काहीतरी टणक वस्तू ठेवून फिरू लागला. तरीही कावळ्याने त्याचा पिच्छा सोडला नाही. एके दिवशी तो दुचाकीवरून जात असताना कावळ्याने हल्ला चढवल्याने तो गडबडून खाली पडला. त्यामुळे चिडून कावळ्यास काहीतरी इजा व्हावी या उद्देशाने चक्क त्या व्यक्तीने स्वताच्या मानेला उभा सुरा लावून त्यावर दोन ब्लेड लावले आहेत. तो व्यक्ती दररोज हा सुरा लावून कार्यलयात तसेच जातो. त्यामुळे शिर्डीकर मोठं कुतुहल म्हणून याकडे पाहत आहेत. “हा व्यक्ती.. तो कावळा” त्यांचे हे समिकरण गेल्या दहा दिवसापासून सोसायटीमध्ये मनोरंजक ठरत आहे.

विश्वाची गती अन्न, वस्त्र, निवारा या चाकावर अवलंबून असते. ते चाक सुरक्षीत ठेवण्यासाठी विश्वातील सर्वच प्राणीमात्राचा आटोकाट प्रयत्न असतो. त्यात कोणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. तर तिथे सुडाचा जन्म होतो. तसाच काहीचा प्रकार शिर्डीच्या साईनगरीत गेली दहा-पंधरा दिवसापासून सुरु आहे. कावळ्याने त्या व्यक्तीच घरातून बाहेर निघणच अवघड केले. तो व्यक्ती घराच्या बाहेर पडताच त्याच्या डोक्याला चोचेने इजा करतो. त्या व्यक्तीच घराबाहेर येण आणि त्या कावळाचा त्या व्यक्तीवर आक्रमण करण हे पहाण्यासाठी लोक आता संस्थान कर्मचारी सोसायटीमध्ये पाहण्यासाठी गर्दी करु लागले. विशेष बाब म्हणजे या सोसायटीत अनेक नागरीक राहतात. आणि लहानमुले ही खेळत राहतात. मात्र तो कावळा कोणालाही त्रास देत नाही. याबाबत कावळ्याचा त्रास कमी करावा यासाठी सोसायटीच्या सचिवांना अनेकांनी तोंडी तक्रारी केल्या आहेत.

एका प्रत्यक्षदर्शीने माहीती देतांना तर सांगितले की, हा व्यक्ती माजी खासदार भाउसाहेब वाकचौरे यांच्या घरासमोरुन दुचाकीवरून जात असतांना त्या कावळ्याने अचानक झडप घातली. त्याचे दुचाकीवरून खाली पडले. त्यात त्यांचे सुमारे चार-पाच हजार रुपयांचे नुकसान ही झाले.

कावळ्याबद्दल काही झकास गोष्टी

१) कावळ्याची स्मरणशक्ती इतर पक्षांपेक्षा फार चांगली असते. २)कावळ्यांना माणसाचे चेहरे चांगलेच लक्षात राहतात ते आपल्या साथीदारांना ही एखाद्या माणसाचे किंवा प्राण्यांचे वर्णन बरोबर सांगतात. त्यामुळे तुम्ही जर का एखाद्या कावळ्याला त्रास दिला तर तो बरोबर तुम्हाला लक्षात ठेवेल. ३)कावळा हा पोपटाबरोबरीचा हुशार पक्षी आहे. कावळ्याच्या मेंदूचे प्रमाण हे त्याच्या शरीराच्या मानाने इतर पक्षांच्या तुलनेत मोठे असते. ४)कावळ्यांच्या टोळीतला जर का एखादा कावळा मरून पडला तर इतर सर्व कावळे त्यांच्या मृतदेहाजवळ जमतात व त्याचे मृत्यूचे कारण शोधून काढतात. ५) आत्तापर्यंत कावळा हा नैसर्गिक पद्धतीने वयोवृद्ध होऊन मृत्यू पावला, असे कुणीही पाहिलेले नाही. ६) कावळा आपल्या वेगवेगळ्या भावना वेगवेगळ्या आवाजातून व्यक्त करत असतो. ७) कावळ्याचे घरटे त्यांनी कुठं आणि किती उंचीवर बांधले आहे यावरून येणाऱ्या पावसाचा अंदाज ठरवता येतो.

साधारणपणे पावसाळ्याच्या तोंडावर कावळे अधिक आक्रमक असतात. पण ते विनाकारण त्रास देत नाही. त्यांचे घरटे मोडल्यास ते 15 ते 20 दिवस त्रास देऊ शकतात. तो व्यक्तीच्या चेहऱ्यासह आवाजही लक्षात ठेवतो. त्यासाठी संबंधितांनी मोठी काळी छत्री घेऊन बाहेर पडावे, जेणेकरून कावळा त्यांना ओळखू शकणार नाही. किंवा शक्य झाल्यास त्या कावळ्याला पकडून दूर सोडावे. –

रोहित बकरे, पक्षी निरीक्षक(श्रीरामपूर) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here