Human Interest Story : ही दोस्ती तुटायची नायं! पक्के हाड-वैरी असलेल्या कुत्रा व मांजराच्या मैत्रीचे सर्वांनाच कुतूहल

0
प्रतिनिधी | जगन्नाथ परजणे | राष्ट्र सह्याद्री 
एकमेकांचे पूर्वी पासून हाड वैरी असलेल्या मुक्या प्राण्यांपैकी कोण म्हटलं तर सर्व प्रथम नाव येतं ते कुत्रा आणि मांजराचे. या दोघांनी एकमेकांना पाहिले तरी क्रूरता निर्माण झाल्याचे अनेकदा आपण पाहिले. परंतु यांची जिवलग मैत्री शिरूरकासार तालुक्यातील एका हॉटेलमध्ये पाहावयास मिळाल्याने कुतुहलाचाच विषय ठरला आहे.
समाजात आजकाल मैत्रीतून दुश्मनीचे अनेक किस्से घडले त्यातून मारामाऱ्या, खून असे अघटित प्रकार घडल्याची उदाहरणे समाजात स्वार्थासाठी पहावयास मिळत आहेत. स्वार्थापायी मैत्री हा विषय नगण्य झाला असल्याने मानसाचे माणूसपण हरवल्यात जमा आहे. अधुनिकतेच्या या जमान्यात माणसात हैवानता क्षणाक्षणाला निर्माण होत आहे. परंतु पशु ,पक्षी,अन् मुके प्राणी आजकाल ख-या अर्थाने आपली प्रमाणिकताकता दाखवताना दिसू लागले.

अशीच निस्वार्थ मैत्री दोन हाडवैरी असलेल्या कुत्रा व मांजर यांच्या मध्ये बीड जिल्ह्यातील शिरूरकासार तालुक्यातील एका हॉटेलमध्ये पहावयास मिळाली. ही मैत्री ईतकी खिलाडू वृत्तीची आहे की, माणसाला माणूसपण आल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे तीन महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये व नंतरही ही दोस्ती तुटायची नायं या मराठी गाण्याप्रमाणे आजही या दोन मुक्या जिवलगांची जिवलग मैत्री कायम असल्याचे पहावयास मिळत आहे.

शिरुरकासार येथील एका हॉटेलच्या जवळ हा कुत्रा आणि मांजर दररोज अन्नाच्या शोधात घुटमळत असताना त्यांच्यात हळूहळू गट्टी जमली. सुरुवातीला हे दोन्हीही हॉटेलमधील उरलेले शिळे खरकटे खाऊन दिवसभर खेळत असत. नंतर-नंतर त्यांच्यात ही मैत्री इतकी घट्ट झाली की हॉटेलमध्ये जेवायला येणारे व हॉटेल मालक स्वतःहून या दोघांना चपाती भात किंवा भाजी खाऊ घालत.

कितीही झाले तरी शेवटी कुत्रा आणि मांजर हाडवैरी या दोघांमध्ये मैत्री जमली असली तरी बाकीचे कुत्रे मात्र या मांजरावर टपून बसलेले असायचे. अशावेळी हा कुत्रा बाकी सर्व कुत्र्यांवर एकट्याने धावून जात असे. आणि मांजराला वाचवत असे. हे पाहून तेथील लोकांनाही गंमत वाटायची. मग ब-याच वेळा हॉटेल मालकही या कुत्र्याच्या मदतीला धावत आणि इतर कुत्र्यांना हाकलून लावत. लॉकडाऊनमध्येही हॉटेल-मालकाने या दोघांची काळजी घेत आठवणीने काही ना काही त्यांना खाऊ घालत असे. त्यामुळे दोघांतील मैत्री लॉकडाऊनमध्येही कायम आहे.


जणू काही शोलेतील जय आणि वीरू प्रमाणे त्यांनी एकमेकांना ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे, असं वचनच दिले आहे. त्यांच्याकडे पाहून लोकही आता म्हणाताएत खरच ही दोस्ती तुटायची नायं…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here