!!भास्करायण : ३७!! राजकारण नको, हवे पाण्याचे नियोजन!

0

राष्ट्र सह्याद्री 29 जून भास्कर खंडागळे, बेलापूर, (9890845551)

जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडण्यावरुन तापलेल्या पाण्यावर राजकारणाची पोळी गेली काही वर्षे भाजून घेतली जात आहे, असे करणे यामागे गेली चाळीस-पन्नास वर्षे सत्ता भोगणार्‍यांचा स्वत:चे अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. त्या पाण्यावर किती दिवस तग धरणार आणि रडत बसणार? यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे गोदावरी खोर्‍यातील गोदावरी, मुळा व प्रवरा नद्यांची पाणी उपलब्धता वाढविणे. पश्चिमेकडील पाणी या नद्यांवरील धरणाच्या पाणलोटाकडे वळवून जवळपास पंचवीस टी.एम.सी.नवीन पाणी उपलब्ध होवू शकते. अशा उपायायोजना राबविण्याचे शहाणपण शासनकर्ते, राजकारणी आणि नियोजनकरांना सुचने आवश्यक आहे. अन्यथा पाण्यावरुन पेटणारा प्रादेशिक वाद अनर्थाला कारणीभूत ठरेल.

गोदावरी खोर्‍यातील पाणी पेटले असून, त्याच्या ज्वाला पसरु लागल्या आहेत. ज्या पद्धतीने यासंदर्भात राजकारण्यांकडून प्रतिक्रिया पुढे येत आहेत, त्यावरुन भविष्यात गोदावरीचे खोरे हे सवंगतेची आदत जडलेल्या राजकारण्यांच्या हाती कोलित पडणार, हे निश्चित आहे. केवळ एकाच दुष्काळाने पाण्याचे नियोजन, व्यवस्थापन आणि वितरण किती मोघम आणि ठिसूळ आहे, हे दाखवून दिले आहे.

या पार्श्वभूमीवर गोदावरी खोरे व जायकवाडी धरणा-संदर्भात विवेचन आवश्यक ठरते. कोणताही पाटबंधारे प्रकल्प बांधताना, आधी पाणी उपलब्धतेची खातरजमा करावी लागते. ज्या पाणलोट क्षेत्रात धरण बांधायचे, त्या पाणलोटात किती पाणी उपलब्ध होणार आहे, यावर धरणाची क्षमता अवलंबून असते. जायकवाडी धरण बांधतानाही असे सर्वेक्षण पाटबंधारे विभागाने करुन व त्यानुसारच जायक-वाडीचा प्रकल्प अहवाल बनविला असणार. या आकडेवारीच्या आधारावर विसंबून व आधिन राहून १०३ दशलक्ष घनफुट (टी.एम.सी.) क्षमतेचे जायक-वाडी धरण बांधण्यात आले. उपलब्ध आकडेवाडीनुसार गेल्या चाळीस वर्षात जायकवाडी धरण केवळ चार वेळ पूर्ण क्षमतेने भरल्याची नोंद आहे!

जर धरणाच्या इतिहासात जायकवाडी धरण केवळ चार वेळाच भरु शकले असेल, तर मग १०३ टी.एम.सी.क्षमतेचे धरण कोणत्या आधारावर बांधण्यात आले? दुसरा पश्न असा की, जायक-वाडीच्या पूर्ण क्षमतेच्या ७० टक्के उपयुक्त, तर सुमारे  ३० टक्के म्हणजे सुमारे २५ टी. एम.सी. (मुळा धरणाच्या क्षमतेइतके तर भंडारदरा धरणाच्या सव्वा दोन पट) इतके पाणी धरणात तसेच साठून राहाते. हा जलसाठा जायकवाडी धरणा-खालील लाभक्षेत्राला दोन वर्षे पुरेल इतका आहे. भांडत बसण्यापेक्षा हा मृतसाठा जिवंत करण्यासाठी  तातडीने उपाययोजना कां केली जावू नये, हे आकलनाच्या पलिकडे आहे.
जायकवाडी प्रकल्पाच्या निमित्ताने आपली जलनिती, व्यवस्थापन आणि नियोजनाचे वास्तवदर्शी चित्र समोर आले आहे. एखाद्या प्रकल्पाचा जलसाठाच जर ३०टक्क्यांपर्यंत राहणार असेल, तर असे मोठे प्रकल्प केवळ भूषणासाठीचे ‘जलहत्ती’ ठरतात!

आज गोदावरी खोर्‍यात आणि जायकवाडीच्या लाभ-क्षेत्रातून पाणी प्रश्नावर आवाज उठतोय. हा आवाज कोणाचा, तर प्रश्न आणि समस्या निर्माण होण्यास कारणीभूत असलेले राज्यकर्ते, राजकारणी तसेच अकलेची दिवाळखोरी असलेल्या प्रशास-कीय यंत्रणेच्या अपयशाचा आहे. त्यामुळे पाण्याचे राजकारण करण्यापेक्षा पाण्याचे नियोजन करणे अधिक गरजेचे आहे. कोणत्याही प्रश्नाचे राजकीय भांडवल वाढविण्याची सवय असलेले राजकारणी गोदावरी खेार्‍याला प्रादेशिक वादाच्या आगीत ढकलतील.

तेंव्हा झाले ते झाले. आता राजकारण, भावनाप्रधान लोका-नुनय आणि प्रादेशिक अस्मिता बाजूला सारुन मुळापासून ते तळापर्यंत ‘गोदावरी खोरे अवघे एक मानून’ नियोजन करण्याची उदात्त व व्यापक भूमिका घेतली पहिजे. गोदावरी खोर्‍यातील पाण्याची उपलब्धता कशी वाढविता येईल, यावर भर दिला पाहिजे. गोदावरी, मुळा, प्रवरा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रातील अनेक उपनद्या तसेच ओढ्या-नाल्यांचे पाणी घाटमाथ्यावरुन पश्चिमे-कडील दर्‍यांकडे झेपावते. या पाण्याला वळण बंधारे, दगडी साठवण बंधारे अशा उपाय-योजनांद्वारे धरणाच्या पाणलोटा-कडे वळविणे सहज शक्य आहे. यामुळे  गोदावरी नदीमध्ये सहा टी. एम.सी., प्रवरा नदीमध्ये दोन टी. एम.सी. तर मुळा नदीमध्ये दोन टी. एम.सी. असे सुमारे १० टी. एम. सी. नवीन पाणी उपलब्ध होऊ शकते.

याप्रमाणेच घाटमाथ्याच्या खाली अनेक पश्चिम वाहिनी नद्या वाहतात. या नद्यांच्या परिसरातले पर्जन्यमान दोन हजार ते पाच हजार मि.मी. इतके प्रचंड आहे. हे पाणी अडवून ते उचलून धरणाच्या पाणलोटात आणले, तर गोदावरी नदीच्या सध्याच्या पाणी उपलब्धतेत सात टी.एम.सी., मुळा नदीच्या पाणी उपलब्धतेत चार टी.एम.सी., तर प्रवरा नदीच्या पाणी उपलब्धतेत चार टी.एम.सी. अशी पंधरा टी.एम.सी.पाणी उपलब्धेची वाढ शक्य आहे. अशातर्‍हेने दोन प्रकारच्या उपाययोजना केल्यास तब्बल २५ टी.एम.सी.नवीन पाणी गोदावरी खोर्‍यात उपलब्ध होवू शकते. असे झाले तर ‘पाणीच पाणी चोहिकडे’ अशी गोदावरी खोर्‍याची सुखद स्थिती बनेल.

अशातर्‍हेने योग्य व सर्वमान्य असे नियोजन व उपाय-योजना करुन  गोदावरी, मुळा व प्रवरा नद्यांच्या खोर्‍यांतील पाणी उपलब्धता वाढविणेची उपय-योजना करुन गोदावरी खोर्‍याचे पेटलेले पाणी वेळीच विझविले पाहिजे.अन्यथा गोदावरी खोर्‍यातील नाशिक व नगर जिल्हे आणि जायकवाडीचे लाभक्षेत्र असलेला मराठवाडा  कायमचे ‘अशांत टापू’ बनण्याचा धोका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here