Ahmednagar : जिल्हा ग्राहक मंचाकडून महावितरणला दंड

0

नगर : महावितरणने ग्राहकास अचानक दोन लाख 37 हजार 290 रुपये वीजदेयक दिल्यामुळे ग्राहकास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी दहा हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाने दिले आहेत. तक्रार दाखल करण्यासाठी झालेला पाच हजार रुपयांचा खर्च देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाने  महावितरणला दिले.

नेवासे तालुक्यातील सोनई येथील भारत रामनाथ दरंदले यांचे पशुखाद्य विक्रीचे दुकान आहे. या दुकानासाठी दरंदले यांनी महावितरण कंपनीकडून वाणिज्य स्वरूपाचा वीजजोड घेतला होता. वीज मीटर नादुरुस्त असताना महावितरणने दोन लाख 37 हजार 290 रुपयाचे बील दरंदले यांना पाठविले. दरंदले यांनी महावितरणकडे वेळोवेळी धाव घेऊन बील दुरुस्त करून देण्याबाबत व मीटर दुरुस्तीबाबत विनंती केली; मात्र महावितरण कंपनीने दरंदले यांना बील कमी करून दिले नाही. त्यामुळे दरंदले यांनी ॲड. गोरक्ष पालवे यांचेमार्फत नगर येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात दावा दाखल केला.

या दाव्याची जिल्हा ग्राहक मंचासमोर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीअंती महावितरण कंपनीने मीटर नादुरुस्त असतानाही चुकीच्या पद्धतीने दरंदले यांना दोन लाख 37 हजार 290 रुपयाचे बील दिल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दरंदले यांना जो शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला, त्या नुकसानीपोटी दहा हजार रुपये व तक्रार खर्चापोटी पाच हजार रुपये देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक मंचाने दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here