प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
राहुरी तालुक्यातील मालुंजे खुर्द (महडुक सेंटर ) येथे चोरट्यांनी पाच ते सात दुकाने फोडून एक लाख रुपयांचा ऐवज लुटला. मात्र, चोरट्यांचा जिल्हा बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न मात्र फसला आहे. बँकेचा सायरन वाजल्याने चोरट्यांनी धूम ठोकली. त्यामुळे बँकेतील ऐवज वाचला.
मालूंजा खुर्द (महाडुक सेंटर) येथे आज सोमवारी पहाटे चार-ते पाच चोरट्यांच्या टोळीने गावातील जिल्हा बँकेच्या शाखेसह किराणा दुकान आणि मेडीकल स्टोअर्स फोडून सुमारे पन्नास ते साठ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. यामध्ये
श्री मेडिकलचे शटर उचकटून येथील अंदाजे दोन हजार रूपयांची रोख रक्कम, साईराज किराणा दुकानातील चाळीस हजार रूपयांची रोख रक्कम वरद कृषी सेवा केंद्रातून दीड हजार रूपये रोख आणि सोहम मेडिकलमधील शेहचाळीस हजार रूपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लांबविली त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा जिल्हा बॅंकेच्या शाखेकडे वळवला बॅंकेच्या खिडकीचे गज कटरच्या साह्याने कट करून चोरट्यांनी आत प्रवेश केला. परंतु तिजोरी शेजारी जाताच सायरन वाजल्याने चोरट्यांनी या ठिकाणहून धूम ठोकली. त्यामुळे बँकेची वित्त हानी टळली.
याठिकाणी चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बँकेतून पळताना कैद झाले आहेत. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यासह श्वान पथक दाखल झाले असून त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस चोरट्यांचा तपास करीत आहे.