कोरोना बाधिताचा मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात; जिल्हा प्रशासनाचा हलगर्जीपणा..!

0

नगर: जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील काल कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ६० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह जिल्हा आरोग्य प्रशासनाने चक्क नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मृतदेह श्रीरामपूरला आल्यानंतर झालेली चूक प्रशासनाच्या लक्षात आली; मात्र तोपर्यंत श्रीरामपूर येथे अंत्यविधीची तयारी पूर्ण झाली होती. तहसीलदार प्रशांत पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन शिंदे यांनी तातडीने अंत्यविधी करणाऱ्या व्यक्तीस पीपीई किट देऊन सुरक्षित पणे दफनविधी पार पाडला. या दफनविधी बरोबरच प्रशासनाची चूक झाकण्याचा प्रयत्नही सुरू आहे.

शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव होत असताना जिल्हा आरोग्य यंत्रणा निष्काळजीपणे वागत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. झालेली चूक मान्य करण्याऐवजी जिल्हा प्रशासन सारवासारव करून त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहे.

श्रीरामपूर शहरातील एका ६० वर्षीय व्यक्तीला छातीत दुखू लागल्याने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला न्यूमोनिया सदृश्य लक्षणे आढळल्याने डॉक्टरांनी नगर येथे जाण्याचा सल्ला दिला. बुधवारी रात्री या रुग्णाला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी त्याची चाचणी करण्यात आली त्यात काल हा रुग्ण कोरूना बाधित असल्याचे समोर आले. दरम्यान, रात्री त्यांची प्रकृती खालावली. पहाटेच्या सुमारास या रुग्णाचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मृतदेह रुग्णाच्या नातेवाईकाकडे देण्यात आला. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे.

आज सकाळी साडेआठ वाजता श्रीरामपूर येथे कुटुंबीय व इतर काही लोकांच्या उपस्थितीत बाधित व्यक्तीचा दफनविधी पार पडला. यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील यांनी आरोग्य यंत्रणेच्या सहाय्याने सोशल डिस्टंसिंग व इतर नियम पाळण्याचा प्रयत्न केला. परंतु नगर मधून बाधित व्यक्तीचा मृतदेह श्रीरामपूरला का आणला गेला? सदर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात का दिला? या बाबत ते खुलासा करू शकले नाही.

जिल्हा आरोग्य यंत्रणेने नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह का दिला? याबाबत सांगता येणार नाही. मात्र सदर मृतदेह श्रीरामपूरला आणला गेल्याचे कळतात आम्ही तो ताब्यात घेतला व संपूर्ण झाकलेल्या अवस्थेत असलेला हा मृतदेह पीपीई किट घातलेल्या व्यक्तीच्या मदतीने दफन केला. 

-डॉ. मोहन शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी, श्रीरामपूर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here