प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील ग्रामपंचायतला गेल्या दोन महिन्यापासून दोन ग्रामसेवक कार्यरत आहेत, अशी माहिती श्रीरामपूर गटविकास अधिकारी यांनी दिली आहे. मात्र, गावातील जनतेच्या प्रश्नासंदर्भात कागदोपत्री सही करण्यासाठी ग्रामसेवक उपलब्ध होत नाही. त्यामुळे अशा ग्रामसेवकांचा करायचं काय, अशी गावकऱ्यांकडून विचारणा होत आहे.
अगोदरच वांगी ग्रामपंचायत अवैधरित्या अतिक्रमण करून बांधलेल्या गाळे प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात असल्यामुळे वांगी ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. आत्ताच बांधकाम झालेल्या दलित वस्तीतील शौचालय प्रकरणी भाऊसाहेब शेंडगे यांनी हजर असलेल्या दोन्ही ग्रामसेवकांना कडे चौकशी केली असता दलित वस्तीतील शौचालय दलित वस्तीत का बांधले नाही याची विचारणा केली असता एकमेकावर कामे कोलून दिली जातात.
यासंदर्भात शेंडगे यांनी गट विकास अधिकारी आभाळे यांच्या कडे चौकशी केली. त्यावेळेस गटविकास अधिकारी यांनी सांगितले की आम्ही ही ग्रामसेवक मुसमाडे यांना चार्ज सोडण्यासाठी नोटीस काढलेली आहे. हा चार्ज ग्रामसेवक बाचकर मॅडम यांच्याकडे देण्यास त्यांना कळविले असूनही त्यांनी अद्यापपर्यंत मुसमाडे यांनी चार्ज सोडलेला नाही. त्यांना मी फोन करून सांगतो, असे गटविकास अधिकारी यांनी कळवले.
तरी वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन चौकशी करून ग्रामपंचायतचा तिढा सोडावा, अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे. स्थानिक राजकारणावरून गरजू व गोरगरीब लोकांचे हाल होत आहेत. दलित वस्तीतील शौचालय दलित वस्तीत झाले नाही तर मी उपोषणास बसणार आहे असे भाऊसाहेब शेंडगे यांनी सांगितले.