प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि ८
कर्जत : ज्यादा दराने युरिया खत विक्री करताना कृषी सेवा चालकास कृषी अधिका-यांनी रंगेहाथ पकडले. या दुकानदारावर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रमोद सुभाष जगताप (राहणार-सितपुर ता.कर्जत) तक्रार दिली होती.
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील बीजांकुर कृषी सेवा केंद्रामधून शेतकऱ्यांना ज्यादा दराने युरिया खत विकून पक्के बील न देता दुकानदार कच्चे बील देत आहे, अशी तक्रार प्रमोद यांनी मंगळवारी तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांच्याकडे केली होती.
कर्जत कृषी कार्यालय आणि पंचायत समितीच्या गुणनियंत्रण अधिकारी यांनी बनावट ग्राहक पाठवित सदर दुकानदारास ज्यादा दराने खत विक्री करताना आणि पक्के बील न देता रंगेहाथ पकडले. यावेळी पथकाने दुकानदाराची युरिया विक्री तात्काळ बंद केली. यासह त्याच्या दुकानातील साठा जप्त करण्यात आला.
या कारवाईत तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, पंचायत समितीचे रुपचंद जगताप, मंडळ कृषी अधिकारी सोनाली हजारे, कृषी पर्यवेक्षक प्रमोद काळदाते, कृषी साह्यक श्याम माळशिकारे सहभागी झाले होते. यावेळी तक्रारदार शेतकरी प्रमोद जगताप, बनावट ग्राहक माऊली भवर, ज्ञानेश्वर लवांडे, अमित गायकवाड आदी उपस्थित होते.