जुनाट वाड्याची भिंत अंगावर पडल्याने ढिगा-याखाली दबून वृद्धेचा मृत्यू
तिच्या जाण्याने तिची अंध मोठी बहिण आता कायमचीच दृष्टीहीन
प्रतिनिधी | राजेंद्र जैन | कडा
दोन वृद्ध बहिणी एकत्र राहत असलेल्या जुन्या वाड्याची भिंत झोपेतच अंगावर पडल्याने एका वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना आष्टी शहरात मंगळवारी रात्री घडली. मात्र या दुर्दैवी घटनेचा दुस-या दिवशी सायंकाळच्या सुमारास उलगडा झाला. आबई लक्ष्मण वारे (वय-७५ ) असे मृत पावलेल्या त्या माऊलीचे नाव आहे.
आष्टी शहरातील कालिका मंदिर परिसरात आबई वारे ही वृद्ध महिला आपल्या मोठ्या बहिणीसह अनेक वर्षांपासून राहत होती. मंदिर परिसरातील जीर्ण अवस्थेत असलेल्या पाटील वाड्यात या दोन्ही बहिणींचे वास्तव्य होतं. मागील काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. पावसामुळे वाड्याच्या जीर्ण भिंतीसह माळवद कमकुवत झाले होते. त्या दिवशी रात्री नेहमीप्रमाणे आबई वाड्यातील खोलीलगत असलेल्या बोळीत, तर त्यांची मोठी बहीण खोलीमध्ये झोपल्या होत्या. रात्री पावसाची भुरभुर सुरू होती. याच दरम्यान जीर्ण झालेली मातीची भिंत आबई यांच्या अंगावर पडली. त्याच खाली दबून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आबईच्या मोठ्या वृद्ध बहिणीलाही ब-याच दिवसांपासून दिसत नाही. आबईच त्यांची सेवा करीत असत. आज नेहमीप्रमाणे आबई चहा-पाणी द्यायला न आल्याने त्यांची मोठी बहीण हाका मारत होती. परंतु आवाज क्षीण असल्याने शेजारी-पाजारी ऐकू गेले नाही. दुपारी तीनच्या सुमारास परिसरातील लहान मुले वाड्याकडे खेळावयास गेली. त्या मुलांना वृद्धेच्या ओरडण्याचा आवाज आल्यामुळे त्यांनी घरी येऊन सांगितल्यानंतर शेजा-यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता, बाहेरून कुलूप असलेल्या खोलीतून वृद्धेचा आवाज येत होता, तर बाजूला भिंत कोसळलेली दिसत होती. त्याखाली उकरून पाहिले असता आबईचा मृतदेह दिसून आला. शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
वेड्या बहिणींची वेडी माया…
घरातील दोघीही बहिणींना देवाधर्माची प्रचंड आवड, संसारात मन न रमल्याने दोघीजणी वडिलांच्या घरी संन्याशाप्रमाणे पहिल्यापासून राहत होत्या. हात-पाय थकेपर्यंत त्यांची पंढरीची वारी चुकत नव्हती. हलाखीच्या परिस्थितीत त्या भाजीविक्री करून गुजराण करायच्या. काही वर्षांपासून मोठ्या बहिणीला दिसणे बंद झाले तसेच हालचाल करता येत नव्हती. अंधत्व आलेल्या मोठ्या बहिणीची आबई आईप्रमाणे सेवा करीत असत. विशेष म्हणजे त्यांचं एकमेकींवर निस्सीम प्रेम होतं. नातेवाईकांनी आपल्याकडे बोलावूनही त्यांनी वडिलांचे घर सोडले नाही. मात्र बहिणींची एकमेकींवरील ही वेडी माया शेवटपर्यंत राहिली.
ती सकाळपासून आलीच नाही…
मोठी बहीण असलेल्या अक्कांना आबईचाच आधार होता. वार्धक्यात शरीर साथ देत नसतानाही आबई आपल्या मोठ्या बहिणीसाठी व स्वतःसाठी स्वयंपाकाची व्यवस्था करीत असत. आज शेजारी जमा झाल्यावर सर्वांना आबई नेहमीप्रमाणे बाहेर गेल्या असाव्यात असे वाटले. परंतु अक्कांनी ‘सकाळपासून आबई माझ्याकडे आली नाही’ असे सांगितले. त्यानंतर सर्वांना त्या भिंतीखाली दबल्याचा संशय आला. उकरून पाहिले असता आबईंचा मृतदेह हाती आला. हे दुर्दैवी चित्र पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त करून अश्रुंना वाट करुन दिली.